इंदापूर : बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा उद्देश जरी वेगळा असला, तरी त्याचा वापर आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी करण्याचा प्रकार सध्या तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष करत असल्याचे चित्र आहे. बँकेचे शाखाप्रमुख, या संस्थांचे खाते उघडण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा अर्ज व सहायक निबंधकांचा आदेश स्वीकारत नाहीत, या कारणावरून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांना घेराव घालण्याचा जो प्रकार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी केला, तो ‘आगामी’ शक्तिप्रदर्शनाआड कोणी येऊ नये म्हणून केलेल्या शक्तिप्रदर्शनाचाच एक भाग होता. सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयाने या वर्षी जून महिन्यात बँकांमध्ये बहुउद्देशीय संस्थांची खाती उघडण्यास परवानगी द्यावी, असा आदेश दिला. त्यानुसार तालुक्यातील सुमारे ७५० संस्थांना बँकेत खाती उघडण्यास परवानगी देण्यात आली. या बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे निकष तयार नाहीत. नोंदणीबाबत अनिश्चितता आहे. खाती उघडण्यास कसलीही कालमर्यादा नाही. मात्र, खाती उघडण्यास परवानगी देण्यात आलेल्या संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा आहे. या संस्थांचे ज्या वेळी मतात रूपांतर होईल त्या वेळी आपण मागे पडायला नको, या एकमेव विचाराने काँग्रेस कार्यकर्त्यांनी २१७ संस्था निर्माण केल्या. सहायक निबंधक कार्यालयात त्यांची नोंदणीही केली. सहायक निबंधकांचा आदेश व आपले पत्र घेऊन या संस्थांचे मुख्य प्रवर्तक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुक्यातील वेगवेगळ्या शाखांमध्ये गेले. मात्र, शाखाप्रमुखांनी त्यांचे अर्ज व निबंधकांचा आदेश स्वीकारला नाही. या संस्थादेखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणेच शेती प्रयोजनासाठी सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेल्या संस्थांना सभासद करून घेणे व कर्जपुरवठा करणे हे काम करणार आहेत. असे असताना खाते उघडण्यास परवानगी न देऊन सहकार कायद्याची पायमल्ली बँकेचे अधिकारी करत आहेत, अशी हरकत घेऊन कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, मयूरसिंह पाटील, महादेव घाडगे या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी जिल्हा बँकेच्या इंदापूर शाखेवर हल्लाबोल केला. बँकेचे विभागीय व्यवस्थापक शिंदे यांना बँकेच्या सभागृहात बोलावून त्यांना घेराव घातला. खाते उघडण्यास परवानगी द्या अथवा आम्ही केलेल्या तक्रारी अर्जावर पोहोच द्या, नाहीतर बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठिय्या मांडून निषेध सभाच घेतो, असा पवित्रा त्यांनी घेतला. आरोपांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी तो फेटाळून लावला. विरोधकांना आपल्या साखर कारखान्यांचे सभासद करून घेण्याची ज्यांची इच्छाशक्ती नाही, त्यांना स्वत:च्या डोळ्यांतले मुसळ दिसणार नाही, मात्र दुसऱ्यांच्या डोळ्यांत ‘नसलेले’ कुसळ दिसणारच ना, असा टोला त्यांनी मारला.
बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा शक्तिप्रदर्शनासाठी वापर
By admin | Published: August 26, 2016 1:19 AM