जळगाव : विज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम विज्ञान लेखनावर देखील होताना दिसत आहे. विज्ञानामुळे अनेक नवीन शब्द तयार होत आहेत. त्या शब्दांना मराठी भाषेत नवीन शब्द मिळत नाही. यामुळे त्याच शब्दाचा वापर विज्ञान लेखनात होत आहे. विज्ञान लेखन करताना भाषा महत्वाची नसून जे शब्द वाचकांना समजतील त्याच शब्दाचा वापर विज्ञान लेखनात करण्यात यावा असा सूर तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात आयोजित ‘विज्ञान लेखन’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी लेखकांकडून उमटला. मराठी विज्ञान परिषदेतर्फे नूतनमराठा महाविद्यालयाच्या जगदिशचंद्र बोस सभागृहात तिसऱ्या विज्ञान संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘विज्ञान लेखन’ या विषयावर चर्चासत्रझाले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील अ.पां.देशपांडे होते.चर्चासत्रात सोलापूर येथील प्रा.राजाभाऊ ढेपे, सांगलीचे प्रा.मोहन मव्दाण्णा, मुंबई येथील डॉ.विवेक पाटकर, नूतनमराठा महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.एल.पी.देशमुख आदी सहभागी झाले होते. चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाव्दारे आपले विषय मांडले. त्या प्रत्येक विषयावर चर्चा करण्यात आली. गणिताच्या सखोल अभ्यासाची गरजडॉ.विवेक पाटकर ‘गणित विज्ञान’ या विषयावर म्हणाले की, गणिताचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. ज्या विद्यार्थ्याला गणिताच्या या भागात जावू नको असे आपण सांगतो. तोच विद्यार्थी त्या विषयात सर्वाधिक गुण मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी गणिताच्या विविध प्रकारांची माहितीदेखील या वेळी दिली. प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख वनस्पतीशास्त्रावर म्हणाले, आदिवासी समाज वनस्पती शास्त्राची जतन करणारा समाज असून, विज्ञान लेखन करताना त्यांच्यावरदेखील लेखन करण्याची गरज आहे.शास्त्रज्ञांच्या कार्यावर लावणी, पोवाडे व श्लोककॅप्टन सुनील सुळे यांनी स्वरचित विज्ञान कविता सादर केल्या़ प्रथम त्यांनी का, कधी, कोण, कुठे या कवितेतून कविता लिहितांनाचे आलेले अनुभव मांडले़ यानंतर त्यांनी गॅलिलीओ या शास्त्रज्ञांच्या कार्यावर पोवाडा सादर केला़ केशवसुतांच्या शैलीला अनुसरून त्यांनी आर्किमेडिजवर कविता तालासुरात सादर केली़ न्यूटनचे कार्य श्लोकाच्या तर लुसीवर आरती सादर केली़ डार्विनच्या मानव उत्क्रांतीच्या कार्यावर त्यांनी लावणीस्वरुपात सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या़
वाचक कोण हे लक्षात घेऊन भाषेचा वापर करा
By admin | Published: February 06, 2017 2:26 AM