मुंबई : हसण्यासारखे औषध जगात कुठेही शोधून आढळणार नाही. भाषा आणि साहित्यामध्ये विनोदांचे स्थान अढळ आहे, असे सांगून मराठी भाषेवर नितांत प्रेम करा, तिचा मान राखा आणि दैनंदिन जीवनात मराठीचाच कटाक्षाने उपयोग करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा पंधरवडा २०१७’चा शुभारंभ, मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पालिका मुख्यालयातील महापालिका सभागृहात झाला, त्या वेळी मराठी भाषेतील नाट्यसंपदा या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून गंगाराम गवाणकर, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महापौर स्नेहल आंबेकर बोलत होत्या. या प्रसंगी आमदार सुनील प्रभू, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, महापालिका आयुक्त अजय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांच्यासह विविध खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते. महापौर म्हणाल्या की, ‘मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असला, तरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. कारण मराठी भाषेचा वारसा हा प्राचीन आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने आपल्या मनात उमटत असतात, त्याला विचाराचे स्वरूप प्राप्त होते. अन्य भाषा शिकायला हरकत नाही, पण मातृभाषेमध्ये आपण पारंगत व समृद्ध असलेच पाहिजे,’ असे महापौरांनी नमूद केले. प्रमुख वक्ते गंगाराम गवाणकर यांनी मार्गदर्शन करताना पु.ल.देशपांडे यांचा एक किस्सा या प्रसंगी सांगितला. ‘पु.ल.देशपांडे यांनी पुण्याला जेव्हा ‘वस्त्रहरण’ नाटक बघितले, तेव्हा ‘हे नाटक मला पुन्हा-पुन्हा बघायला तर आवडेल, पण त्यापेक्षाही एखादी छोटी भूमिका मला या नाटकात करता आली, तर ते अधिक बरे होईल,’ असे लिखित पत्र आपल्याला पाठविल्याची नोंद मी माज्या आत्मचरित्रात घेतली,’ असल्याची माहिती गंगाराम गवाणकर यांनी या वेळी दिली. त्यासोबतच ‘वस्त्रहरण’ नाटकाची संपूर्ण टीम नाटकाचा प्रयोग लंडन येथे सादर करण्यासाठी विमानाने जात असताना, विमानात घडलेल्या प्रसंगाचे खुमासदार वर्णन गंगाराम गवाणकर यांनी या वेळी आपल्या भाषणातून केले. तेव्हा संपूर्ण सभागृह अक्षरश: हास्यामध्ये न्हाऊन निघाले होते. या प्रसंगी ज्येष्ठ नाट्य कलावंत गंगाराम गवाणकर यांचा महापौरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)>मालवणी भाषेला सातासमुद्रापार नेण्यामध्ये ‘वस्त्रहरण’ची महत्त्वपूर्ण भूमिकाबोलीभाषेचा गोडवा हा अविट असून, कोकणातील मालवणी भाषेला सातासमुद्रापार नेण्यामध्ये माझ्या ‘वस्त्रहरण’ नाटकाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाट्य कलावंत, तसेच यंदाच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केले.
दैनंदिन जीवनात मराठीचा उपयोग करा
By admin | Published: February 28, 2017 2:28 AM