वणी - आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी निश्चितपणे रस्त्यावर उतरून आपल्या भागातील जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे यात शंका नाही. आज देशात, महाराष्ट्रात जे चित्र निर्माण होतंय, अनेकदा दबावतंत्राचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या युक्त्या लढवून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं वलय कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सांगत आमदार खासदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे असा गंभीर दावा उद्धवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी केला आहे. वणी येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या सभेत खासदार संजय देशमुख म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचं वलय कमी करण्यासाठी कसं आमदार फोडता येतील, कसं खासदार फोडता येईल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र प्रयत्न सुरू आहे. टीव्हीच्या माध्यमातून हे सगळं आपण पाहतोय असं त्यांनी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात काही नाव न सांगता प्रवेश होतील
ऑपरेशन टायगर या माध्यमातून ठाकरे गटातील अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत घेण्याची मोहिम आखली जात आहे. त्यात अलीकडेच काही माजी आमदार शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत आलेत. त्यात शिंदे गटात तिसऱ्या टप्प्यात काही पक्षप्रवेश होणार आहेत. ते नाव न सांगता होणार आहेत. आदल्या दिवशी तुम्हाला नाव सांगितले जाईल असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. अनेक लोकांना शिंदेंचे नेतृत्व मान्य झालेले आहे. काल स्वतःहून काही लोक सांगत होते की, आमचा प्रवेश करून घ्या, त्यांचा तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करून घेण्यात येणार आहे. राजा का बेटा राजा नही बनेगा याचा अर्थ कार्यकर्त्यांना मोठे करायचे आहे असं सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. परंतु विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी खऱ्या वारसदाराला बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांची शिवसेना, निशाणी, झेंडा हा तोतया वारसदारांचा असल्याचं ठरवलं हे दुर्दैवी आहे असं सांगत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला होता.