ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 30 - शेगावमध्ये एका १४ वर्षीय बालकावर मंत्रोपचार करून वरलीचे आकडे काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न रविवारी शेगाव जिल्हा बुलडाणा येथे उघडकीस आला. या घटनेत पोलिसांनी एका महाराजासह दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील खामगाव रोडवरील गजानन वाटिका येथे चालू असलेल्या पारायणातील महाप्रसाद घेऊन एक १४ वर्षीय लहान मुलगा बाहेर आला असता व्यंकटेश नगरात राहणाऱ्या गणेश प्रल्हाद ताले(२९) या इसमाने त्याला आपल्या मोटारसायकलवर बसवून एमएसईबी चौकातील एका पान टपरीच्या मागे नेले. तेथे शंकर जगदेव शेगोकार उर्फ महाराज (वय ६५ रा. तिनपुतळा शेगाव) हा आधीच हजर होता. तेथे त्यांनी बालकाच्याच अंगावर कपडा टाकून त्याच्यासमोर कापूर जाळून व मंत्रोपचार करीत त्याच्या हातात उल्टी कपबशी देऊन त्यास आकडे म्हणावयास लावले. सदर मुलाने आकडे सांगितल्यानंतर हा मुलगा आपल्या कामाचा आहे, असे एकमेकांना सांगितले. या मुलावर या महाराजाने व सदर व्यक्तीने अघोरी कृत्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कृत्य करण्यापूर्वीच या बालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती त्याने वडिलाला दिल्यानंतर वडील रविवारी अनिल जनार्दन बढे व्यंकटेश नगर शेगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २७/२०१७ कलम महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि आणि अघोरी कृत्य प्रतिबंधात्मक तसेच काळी जादू अधिनियम २०१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करून मांत्रिक महाराजासह दोन्ही आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे. या प्रकरणाचा आता पुढील तपास एपीआय किशोर तावडे करीत आहेत. मांत्रिकाने जादूटोण्यात वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे.
वरलीचे आकडे काढण्यासाठी पायाळू मुलाचा वापर
By admin | Published: January 30, 2017 4:01 PM