मनीषा म्हात्रे मुंबई : मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्यासाठी सामान्य माणसाच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या माहिती अधिकाराचा (आरटीआय) वापर कुख्यात मोस्ट वाण्टेड डॉन दाऊद इब्राहीम टोळीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याच आरटीआयच्या माध्यमातून बड्या व्यावसायिकांची माहिती काढून त्यांना धमकाविण्याचे काम ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या मुमताज खानकडे इक्बालने सोपविले होते. कासकरविरुद्ध तक्रारदार पुढे येत असून आणखीन १५ ते २० गुन्हे त्याच्यावर दाखल होण्याची शक्यता आहे.कराचीमध्ये बसून जगभरातील ‘डी गँग’चा कारभार दाऊद चालवतो. त्याची बहीण हसिना पारकर मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटच्या इमारतीत बसून कारभार पाहायची. पारकरच्या मृत्यूनंतर सर्व सूत्रे इक्बालच्या हाती आली. हसिनाने तयार केलेली यंत्रणा विश्वासू साथीदारांच्या मदतीने इक्बाल हे काम बघू लागला. यासाठी इक्बालने जवळच्या साप्ताहिकात काम करणाºया मुमताजच्या मदतीने माहिती काढायचा. नागपाडा परिसरात राहणारा मुमताज हा साप्ताहिकात पत्रकार म्हणून काम करायचा. तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्याचा वावर होता. मुमताजच्या अटकेनंतरआणखीन एक साथीदार अफजल अली खान उर्फ अफजल पाणीवाला हैद्राबादला कुटुंबियांसोबत रवाना झाला. दोघांच्याही घराबाहेर दीडशे ते तीनशे मीटर अंतरापर्यंत सीसीटीव्हीचे कुंपण आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ४७ हून अधिक गुन्हे आहेत. त्याची कासकरसोबत उठबस होती. त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. नुकताच हैद्राबादमध्ये अल्पवयीन मुलींशी विवाह प्रकरणी कारवाईत पाणीवाल्याच्या सासºयालाही अटक करण्यात आली होती. पाणीवाला हा माहिती अधिकारातून व्यावसायिकांची माहिती मिळवायचा. त्यानंतर मुमताज संबंधित व्यक्तींकडे कासकरमार्फत प्रस्ताव ठेवत होता. त्यानंतर ही प्रकरणे इक्बालला येऊन सांगायचा.मुमताज पुढे प्रस्ताव मांडायचा. यामध्ये त्याला काही नगरसेवक, बडे नेते आणि शासकीय कार्यालयातील कर्मचारीही माहिती पुरवत होते. इक्बाल त्यांना कराचीमधून भाईचा फोन येईल असे धमकावायचा. अशारितीने त्याचा खंडणीचा व्यवसाय सुरू होता.कासकरच्या अटकेनंतर मुंबईतील काही जण गायब झाले आहेत. शुक्रवारी मुंबईतून आणखीन एका संशयितालाचौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे याप्रकरणात आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.>प्रदीप शर्मा यांची नियुक्ती नियोजनपूर्वकभाजप सरकारने छोटा राजनला भारतात आणून दाऊद विरोधातील आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली होती. त्यानंतर दाऊदचे मुंबईतील साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी काही अधिकाºयांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यात मंत्री बनलेल्या आयपीएस अधिकाºयाचा मोठा वाटा आहे. तसेच ज्यावेळी हे अधिकारी गजाआड गेले होते. त्यावेळी अंडरवर्ल्डमधून कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. याचाच फायदा उठवून अंडरवर्ल्ड आणि मुख्यत्वेकरून दाऊदच्या साम्राज्याला संपवण्यासाठी या हालचाली असल्याची चर्चा सुरू झाली. याचाच भाग म्हणून एनकाऊण्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची नेमणूक ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकात करण्यात आली.आधी त्यांनी दाऊदच्या मुंबईतील साम्राज्यास सुरुंग लावण्यासाठी माहिती काढण्यास सुरुवात केली. इक्बाल कासकर याची प्रसिध्दी माध्यमांसमोर आलेली अटक तेवढी साधी नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याविरुद्ध फास आवळण्यात आला होता. त्यातूनच पुढे आलेल्या तक्रारदाराच्या मदतीने सुरुवातीला मुमताज आणि इसरारच्या चौकशीतून इक्बालभोवती अटकेचा फास आवळला.हैद्राबादमध्ये अफजल पाणीवाला हा माहिती अधिकारातून व्यावसायिकांची माहिती मिळवायचा. त्यानंतर मुमताज संबंधित व्यक्तींकडे कासकरमार्फत प्रस्ताव ठेवत होता. त्यानंतर ही प्रकरणे इक्बालला येऊन सांगायचा.
‘डी गँग’कडून ‘आरटीआय’चा वापर, आणखी १५ ते २० गुन्हे दाखल होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 4:56 AM