पुणे : पॉश युनिफॉर्म, टाय, शूज, बसायला बेंच हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील आकर्षण आता जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्येदेखील उपलब्ध असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा दर्जेदार व मोफत शिक्षणाबरोबरच मुलांच्या आरोग्याची काळजी म्हणून पोषण आहार, लसीकरण आणि आरोग्य तपासणी आदी अनेक गोष्टी अंगणावाड्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता महिला बालकल्याण विभागाच्या वतीनेदेखील सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.शासनाने बालकांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअतंर्गत प्रत्येक खेडेगावात अंगणवाडी केंद्र सुरू केले. पुणे जिल्ह्यात आजअखेर तब्बल ४ हजार १६७ अंगणवाडी केंदे्र सुरू आहेत. या अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून प्रामुख्याने बालमृत्यू, कुपोषण व शारीरिक अपंगत्व टाळण्यासाठी ० ते ६ वयोगटातील बालकांना लसीकरण देणे, अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना पोषण आहार देणे, गरोदर मातांची नोंद ठेवणे त्यांना आवश्यक असलेला औषधोपचार, गोळ््यांचा पुरवठा करणे आदी कामे करण्यात येत. याशिवाय इतरही अनेक सरकारी कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागत. यामुळे मात्र बालकांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये बदल करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने दोन वर्षांपासून अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी ‘पूर्वशालेय शिक्षण उपक्रम’ हा खास प्रकल्प सुरू केला आहे. या उपक्रमाअतंर्गत बालकांना खासगी प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी, केजीच्या मुलांच्या दर्जाचे शिक्षण सरकारी अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेच्या मार्गदर्शनासाठी बालकांसाठी ‘बालशिक्षणक्रम’ हा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या बोलक्या अंगणवाड्या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत असून, मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याऐवजी अंगणवाडीत प्रवेश घेऊ लागले आहेत. बोलक्या अंगणवाड्यांसाठी सर्व खर्च आतापर्यंत तब्बल १५ कोटी रुपये हे लोकसहभागातून करण्यात आला आहे. त्यामुळेच अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता व्हॉटस् अॅपद्वारे दीड ते तीन मिनिटांची व्हीडीओ क्लिप तायर करण्यात आली असून, जास्तीत जास्त मुलांनी अंगणवाडीत प्रवेश घेण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे कंद यांनी सांगितले.
अंगणवाडी प्रवेशासाठी सोशल मीडियाचा वापर
By admin | Published: April 29, 2016 2:07 AM