मुंबई : भारतीय सैन्य, हवाई दलाची विमाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इलेक्ट्रॉनिक संदेश असलेली भाजपची प्रचार कार्ड मंगळवारी जप्त केली गेली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने खार येथील एका फ्लॅटमधून हे प्रचार साहित्य जप्त केले.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांसह खार येथील युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीची मालकी असलेल्या इमारतीत हे प्रचार साहित्य हस्तगत केले. निवडणूक आयोगाने ही जागा सील करून येथील प्रचार साहित्य जप्त केले आहे. प्रचारासाठी सैन्याचा वापर करू नये, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. तरीही येथे प्रचारासाठी भारतीय सैन्य, विमाने आणि मोदींचा संदेश असलेले इलेक्ट्रॉनिक कार्ड तयार करण्यात येत होते. कार्ड उघडताच मोदींचा रेकॉर्डेड संदेश ऐकू जाईल, असे हे कार्ड आहे. हे कार्ड छापण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नव्हती. किती कार्ड छापले याचा उल्लेख नव्हता, असा आरोप सावंत यांनी केला.
आयोगाने जप्त केलेला एकूण माल ६ कोटांचा असून प्रत्येक कार्ड ३०० रुपयांचे आहे. मै भी चौकीदार म्हणणारे चोर आहेत हे यानिमित्ताने स्पष्ट झाल्याचा आरोप सावंत यांनी केला.
युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकाने अवैध कामांसाठी स्वत:ची जागा दिली. या कंपनीच्या मालकाचे भाजप नेत्यांशी संबंध आहेत. कंपनीच्या बॉक्समध्येच कार्ड पाठवण्यात येणार होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि या कंपनीच्या मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे सचिन सावंत यांनी केली.