अकोला : अलीकडच्या पाच वर्षात सोयाबीन व इतर पिकांवर तणनाशकांचा वापर वाढला असून, इतरही पिकांवर तणनाशके वापरण्यास सुरुवात झाली आहे .आठ वर्षांपूर्वी केवळ ५ टक्के शेतकरी तणनाशकांचा वापर करीत होते. आजमितीस हे प्रमाण ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी तणनाशकांचा वापर वाढण्याची शक्यता आहे; पण तणनाशकांचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने केला जात नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तणांमुळे पिकांचे होणारे नुकसान, मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र २0 लाख हेक्टरने वाढले आहे. या पिकाच्या मशागतीचा खर्च कमी आणि उत्पादन बर्यापैकी होत असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळला आहे; पण अनेक ठिकाणी तर पीक उगवलेच नसल्याचे प्रकार घडले असल्याने तणनाशक वापर करताना आता शेतकर्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
* अचूक मात्रा देण्याची गरज
गत दोन वर्षांपासून ९२ टक्के शेतकर्यांनी सोयाबीन पिकासाठी तणनाशकांचा वापर केला. यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे; परंतु तणनाशकांची नेमकी मात्रा न दिल्याने ८६ टक्के शेतकर्यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे.