- स्नेहा मोरे, मुंबई
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारादरम्यान येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक ताणावर मात करणे हे सर्वांत मोठे आव्हान असते. जागतिक स्तरावर विविध पातळ्यांवर कर्करोगविषयक संशोधन सुरू आहे. त्याच धर्तीवर, १९४६ साली युरोपमध्ये पोलिओच्या उद्रेकानंतर ‘इक्वान थेरपी’ अर्थात हिप्पोथेरपीचा प्रथम वापर करण्यात आला. भारतात मात्र पहिल्यांदाच ७१ वर्षांनंतर आता हा प्रयोग होणार आहे. या थेरपींतर्गत कर्करुग्णांना घोड्यांच्या सहवासात ठेवले जाते. ‘जागतिक कर्करोग दिना’चे निमित्त साधून कर्करोग रुग्णांना घोड्यांच्या सहवास नेऊन वेगळ्या धाटणीच्या उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. घोड्यांसोबत काही वेळ सहभागी व्हावे लागते. या थेरपीच्या माध्यमातून समतोल, स्नायूंची पुनर्बांधणी, प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. तर मानसिकरीत्या रुग्णाचा आत्मविश्वास वाढविणे, चिंता कमी करणे, नैराश्यावस्थेतून रुग्णाला बाहेर काढण्यास साहाय्य करत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ‘हिप्पोथेरपी’च्या माध्यमातून रुग्णाचे घोड्याशी वेगळ्या प्रकारचे भावनिक नाते तयार होते. या माध्यमातून कर्करोगामुळे दीर्घकाळ मानसिक संतुलन ढासळलेल्या रुग्णांना दुहेरी विकास साधता येतो. परदेशात याविषयी विविध संस्था कार्यरत असून रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही उपचार पद्धती आखली जाते. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन संस्थेने स्तनाचा कर्करोग झालेल्या २० महिलांसोबत ही उपचार पद्धती राबविली.१६ आठवड्यांच्या या उपचार पद्धतीत घोड्यांची काळजी घेणे, घोडेस्वारी, घोड्यांच्या दिनचर्येत सहभागी होणे अशा विविध कार्यांचा समावेश होतो. या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अभ्यासांती सहभागी रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत विकास झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)- रुग्ण घेणार सहभागजागतिक कर्करोग दिनाचे निमित्त साधून इंडियन कॅन्सर सोसायटी आणि अॅमच्युर रायडर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील १५-२० कर्करोग रुग्ण ‘इक्वान थेरपी’चा लाभ घेणार आहेत. शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर पार पडेल.भविष्यात आपल्या देशातही याविषयी जनजागृती करून या उपचार पद्धतीचा विस्तार करण्याचा विचार आहे. ही उपचारपद्धती नक्की लाभदायक ठरेल, असा विश्वास आहे.- डॉ. विनय देशमाने, सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट, वैद्यकीय संचालक (इंडियन कॅन्सर सोसायटी)