पुणे : नियतीने समोर काहीही ठेवले तरी स्वतःच्या कष्टाने मात करणाऱ्या प्रत्येकाचा मार्ग पुढे उजळ होतोच. वयाच्या ७ व्या वर्षांपासून मैला उचलणाऱ्या राजस्थानच्या उषा चौमार यांचीही कहाणी अशीच असून त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या जोरावर स्वतःची नवी ओळख प्रस्थापित केली आहे. स्वतःसोबत इतर महिलांच्या आयुष्यतही आशेचा दीप लावणाऱ्या उषा यांना नुकताच पद्मश्री किताब जाहीर झाला.
वय अवघं सात वर्ष... मैलापाणी साफ करण्याचं काम करणाऱ्या उषा यांचे बालपण त्याच कामाने अक्षरशः कोमेजून गेले. वयाच्या १०व्या वर्षी त्यांचेलग्न झाले. मात्र त्यांच्या दुर्दैवाचा फेरा इथेही चुकणार नव्हता. लग्न झाल्यावरही त्यांना तेच काम करावे लागत होते. या कामाला ना समाजात प्रतिष्ठा होती ना सन्मान. उलट इतरांसाठी काम करणाऱ्या या कामगारांना मंदिरात प्रवेश नव्हता. इतकेच नव्हे तर किराणा व्यापारीही त्यांना सामान देत नव्हता. उषा यांना हे सगळं लक्षात येत होतं मात्र त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता.
त्यात एकदा यांचा सुलभ इंटरनॅशनल संस्थेशी संपर्क आला आणि त्याचे आयुष्यच बदलले. आज त्या या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे शिवणकाम, मेहंदी बनवणे असे शिक्षण दिले जाते. हा प्रवास सोपा नसला तरी त्यांनी मेहनतीने आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर महिलांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणले आहेत.
उषा यांचे पती अजूनही मजुरी करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी ग्रॅज्युएशन करत असून मुलगा वडिलांना मदत करतो. त्या इतक्या प्रभावी वक्त्या आहेत की त्यासाठी त्यांनी परदेशवारीही केली आहे. या संपूर्ण कामाचे श्रेय त्या सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ बिंदेश्वर पाठक यांना देतात. एक महिला जी कधी अस्पृश्यता आणि समाजातल्या जातीयवादाच्या मानसिकतेच्या विरोधात उभी राहू शकेल याची तिलाही खात्री नव्हती, त्याच उषा चौमार आज महिलांसाठी उजळत्या दीपस्तंभासारखं काम करत आहेत.