मुंबई : उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे, आशा खाडिलकर यांच्यासह कृषी, उद्योग, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील ४४ नामवंतांना रविवारी ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेतर्फे रंगशारदा सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पीपल्स आर्ट सेंटरचे विश्वस्त गोपकुमार पिल्लई आणि अध्यक्ष डॉ. आर. के. शेट्टी उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले की, कलाकार, उद्योजक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, श्रमिक व सृजनात्मक कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींमुळे देश मोठा होत असतो. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.
नागपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. उदय माहूरकर, बीव्हीजी कंपनीचे हनुमंतराव गायकवाड, तबलावादक माधव पवार, बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे, शिल्पकार भगवान रामपुरे, चित्रकार प्रभाकर कोलते, वास्तुविशारद शशी प्रभू, पर्यावरण कार्यकर्ते किशोर रिठे, दीपक शिकारपूर यांनाही राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.