कोल्हापूर : महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला असून, विनाकपात एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल मिळणार आहे. उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनंतर देण्यावर एकमत झाले. त्यामुळे आज, सोमवारपासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.ऊसदराबाबत राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांचे नेते यांच्यात एकमत न झाल्याने गळीत हंगाम रखडला होता. खा. शेट्टी यांनी प्रतिटन ३४०० रुपये, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३५०० रुपये, तर ‘रयत’चे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक ३०० रुपयांची पहिली उचल मागितली होती. शेतकरी संघटनेची लवचीकता व कारखानदारांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन मंत्री पाटील यांनी तोडगा काढला.‘एफआरपी’ व ७० : ३० चे दोन कायदे असताना प्रत्येक वर्षी साखर कारखानदारांची अडवणूक योग्य नाही. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड झाली असली तरी अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा ६०० रुपये जादा दिले आहेत. मग हंगामाच्या सुरुवातीलाच खोडा का घालता, अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी केली.कायद्याची भाषा आता बोलता; मग ‘एफआरपी’ देण्याची ताकद कारखान्यांकडे नव्हती त्या वेळी ‘८० : २०’ हा फॉर्म्युला कोणी आणला? त्या वेळी तुमचा कायदा कोठे गेला होता? आम्ही दोन पावले मागे घेऊन दर मान्य केला. आता साखरेचे दर चांगले असल्याने शेतकºयांना चार पैसे जादा मिळाले तर बिघडले कोठे, अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली.कोल्हापूर जिल्ह्यातीलसाखर कारखानदारांनी मान्य केलेला हा तोडगा राज्यातील इतर कारखानदारांनी मान्य करून त्यानुसारच पहिली उचल द्यावी.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनाआम्हाला हा तोडगा मान्य नाही. आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार. गुजरातमधील कारखाने ४४०० रुपये दर देऊ शकतात, मग तुम्हाला अशक्य का?- रघुनाथदादा पाटील,नेते, शेतकरी संघटना
ऊसदराची कोंडी फुटली, पहिली उचल ‘एफआरपी अधिक २०० रुपये’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:51 AM