- योगेश पांडे, नागपूरमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते ते त्यांच्या कुटुंबीयांकडे. याकूबचे भाऊ उस्मान व सुलेमान हे सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. फाशी झाल्याचे कळताच दोघांच्याही संयमाचा बांध फुटला व हॉटेलच्या रूममध्ये ते एकमेकांना बिलगून रडले. ८.१५ च्या सुमारास हॉटेलमधून तुरुंगाकडे जात असतानादेखील ते एकमेकांना धीर देतच बाहेर आले. शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या याकूबची फाशी कायद्यातील विविध तरतुदींचा आधार घेऊनही टळू न शकल्यामुळे दोघेही निराश झाले होते. नवी दिल्लीत रात्रभर सुरू असलेल्या घडामोडींनंतर याकूबची फाशी थांबणार नाही हे स्पष्ट झाले होते. उस्मान व सुलेमानला रात्री २.१५ वाजताच्या सुमारास तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हॉटेलवर येऊन फाशीसंदर्भात नोटीस दिली. राष्ट्रपतींनी याकूबची दया याचिका फेटाळली आहे आणि ‘डेथ वॉरंट’प्रमाणे फाशीची प्रक्रिया सकाळी पूर्ण करण्यात येईल या दोन बाबी नोटिसीत नमूद होत्या. ही नोटीस हाती पडताच सुलेमान व उस्मानचे अवसानच गळाले. वकिलांचा सल्ला, नातेवाइकांना सूचनादरम्यान, पहाटेच्या सुमारास मुंबई येथे फोन करून त्यांनी नातेवाइकांना अंत्यविधीसंदर्भात काही सूचना दिल्या. याकूबचा मृतदेह मिळाला नाही तर काय करायचे याबाबत वकिलांशीही त्यांनी चर्चा केली. बराच वेळ ‘वेट अॅन्ड वॉच’ : याकूबला फाशी दिल्यानंतर दोघेही कारागृहाकडे कधी निघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उस्मान ६.३० नंतर लिफ्टने खालीदेखील आला. परंतु प्रसिद्धीमाध्यमांची गर्दी पाहून आल्यापावली परत गेला. लुंगी घालून आलेल्या उस्मानच्या हाती यावेळी काही कागदपत्रे होती व डोळे पूर्णत: लाल झाले होते. त्यानंतर दोघेही तासभर खोलीतच बसून होते. अखेर तुरुंगातील शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कळताच दोघेही सकाळी ८ च्या सुमारास तुरुंगाकडे रवाना झाले.
उस्मान व सुलेमान झाले नि:शब्द
By admin | Published: July 31, 2015 4:12 AM