उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 01:59 PM2024-08-16T13:59:13+5:302024-08-16T14:01:58+5:30

समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाशी केली चर्चा, महाराष्ट्रात समाजवादी महाविकास आघाडीत सहभागी होणार का हे आगामी काळात कळेल. 

Uttar Pradesh won now Maharashtra...; Samajwadi Party asked Mahavikas Aghadi for 12 seats in election | उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा

उत्तर प्रदेश जिंकलं आता महाराष्ट्र...; समाजवादी पक्षानं मविआला मागितल्या 'इतक्या' जागा

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीने दणदणीत यश मिळवलं. याठिकाणी ८० पैकी ३७ जागा जिंकून समाजवादीनं चांगली कामगिरी केली. आता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सपाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात सपाने १२ जागांची मागणी केली असून काँग्रेस आणि महाविकास आघाडी पक्षाला जागा सोडतील अशी आशा सपाच्या नेत्यांना आहे.

सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे याआधीच यादी पाठवली आहे. राज्यात भाजपा विरोधी मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी समाजवादी पक्षानं मविआकडे १२ जागांची मागणी केली आहे. समाजवादी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी नेते प्रयत्नशील आहेत असं महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आमदार अबु आझमी यांनी म्हटलं आहे. 

समाजवादी पक्षाने रावेर, अमरावती जागेवरही दावा केला आहे ज्याठिकाणी सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. त्याठिकाणी अल्पसंख्याकांची मते आणि सरकारविरोधी मते त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असं सपा नेत्यांना वाटतं. त्याशिवाय मानखुर्द-शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, भिवंडी मध्य, मालेगाव मध्य, भायखळा, वर्सोवा, धुळे, औरंगाबाद पूर्व, अनुशक्तीनगर आणि कारंजा या विधानसभा मतदारसंघाची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.

मागील निवडणुकीत झालेल्या विश्वासघाताबद्दलही सपाच्या राज्य नेतृत्वाने केंद्रीय नेतृत्वाला सावध केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी सुरू होत्या परंतु शेवटच्या क्षणी हे दोन्ही पक्ष मागे हटले. त्यामुळे समाजवादी पक्षाला निवडणुकीची तयारी आणि उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही अशी आठवण समाजवादी पक्षाच्या राज्य नेतृत्वाने केली. मात्र यानंतरही समाजवादी पक्षाने २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून २०२२ पर्यंत पाठिंबा दिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ४८ ठिकाणी मविआ उमेदवारांना मदत केली असं समाजवादी पक्षाने सांगितले आहे. 

अजून जागावाटपावर चर्चा नाही - काँग्रेस

दरम्यान, सपाच्या मागणीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं की, समाजवादी पक्ष, सीपीआय हे महाविकास आघाडीसोबत आहेत. अजून जागावाटपावर चर्चा झाली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यासोबत आधी चर्चा झाल्यानंतर इतर मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल. आम्ही समाजवादी पक्षाशीही चर्चा करू त्यांना आमच्या आघाडीसोबत ठेवू असं त्यांनी सांगितले.

Web Title: Uttar Pradesh won now Maharashtra...; Samajwadi Party asked Mahavikas Aghadi for 12 seats in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.