लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रविवारपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे खेड आणि चिपळूण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. चिपळूण आणि खेड बाजारपेठेत पाणी भरल्याने व्यापाऱ्यांचे हाल झाले. रविवारी सायंकाळपासून बरसलेल्या या पावसाचा उत्तर रत्नागिरीला जास्त फटका बसला. राजापूर तालुक्यातील कुवेशी येथे पावसामुळे आलेल्या पुरात एकजण बुडाला आहे. सिंधुदुर्ग तसेच रायगड या दोन जिल्ह्यांतही आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. येत्या २४ तासांतही उत्तर व दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खेड शहरात नारिंगी आणि जगबुडी नदीचे पाणी घुसले आहे. तालुक्यातील तळे तसेच खेड दहीवली मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. चिपळूण तालुक्यातही रविवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरातील शिव व वाशिष्ठी या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. चिपळूण बाजारपेठेतही पाणी घुसले आहे. जिल्ह्यात दापोली, खेड, लांजा, राजापूर आदी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. कुवेशी (ता.राजापूर) येथे राहूल रामचंद्र नार्वेकर (२४, कुवेशी नार्वेकरवाडी) हा तरूण सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वहाळावर गेला असता पाण्याच्या लोंढ्यामुळे वहाळात बुडून मृत्यू झाला आहे.
उत्तर रत्नागिरीला पावसाने झोडपले
By admin | Published: June 27, 2017 1:32 AM