दोन दिवसांपूर्वी गंगोत्रीला जात असताना कार दरीत कोसळून आग लागल्याने सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर गुरुवारी उत्तरकाशीमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो कार यमुनोत्रीच्या मार्गावर असताना दरीत कोसळली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून काही जण अंधेरी तर काहीजण भंडारा जिल्ह्यातील आहेत. जखमींना बडकोट आणि नौगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. १२ भाविकांना घेऊन हे वाहन जानकीचट्टीहून बड़कोटला निघाले होते. रात्री उशिरा ही कार यमुनोत्री धामपासून २८ किमी दूर ओजरीजवळ असताना दरीत कोसळले.
समोरून येणाऱ्या बसला तीव्र वळणावर साईड देत असताना चालकाने कार मागे घेतली. याचवेळी नियंत्रण गमावल्याने पाठीमागे दरीत जाऊन कार कोसळली. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवत चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना दरीतून वर आणले. अपघातस्थळी रस्ता अरुंद असून सुरक्षेसाठी संरक्षक कठडे देखील नाहीत. मृत आणि जखमी सारे महाराष्ट्रातील आहेत.
मृतांची नावे : पूरण नाथ (40) रा. अंधेरी ईस्ट मुंबई, जयश्री अनिल कोसरे (26) रा. तुमसर, भंडारा, अशोक महादेव राव (40) रा. नागपूर, अशी मृतांची नावे आहेत.
जखमींची नावे : प्रेरणा (8), अंजू अशोक राव (4); बोदी (10) भंडारा; प्रमोद तुलसी (52); बाळकृष्ण जीटू (41) रा. भंडारा; लक्ष्मी बालकृष्ण कोसरे (46) भंडारा; दिनेश (35) रा. भंडारा; मोनिका (24) रा. भंडारा; कृषिता (15), रचना (38) रा. भंडारा अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.