विरार : महाराष्ट्रातून सहभागी झालेले १३५ स्पर्धक आणि सलग बारा तास चाललेल्या अभंग स्पर्धेच्या खुल्या गटात अक्षर वैरागी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर बालगटात आर्यन जामसुतकरने बाजी मारली. विरारच्या यंग स्टार ट्रस्टने ही स्पर्धा आयोजित केली होती. यात केवळ एक अभंग सादर करावयाचा असल्याने स्पर्धेत चुरस होती. सकाळी ११ वाजता सुरु झालेली स्पर्धा रात्री ११ वाजता समाप्त झाली. यावेळी विरारकरांना बाहेर कोसळणाऱ्या धो धो पावसासोबत अभंगांची संततधार अनुभवायास मिळाली. स्पर्धकांनी भक्तीभावाने अभंग सादर केले. तर रसिक अभंगांनी न्हाऊन गेले. ज्येष्ठ भजन कलावंत बल्लाळ निमकर आणि नाट्यकलावंत शांताराम वाळींजकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. नगरसेवक अजीव पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, मिलिंंद पवार, मिलिंंद पोंक्षे, आरती वढेर, संदीप फाटक, डॉ. रजनी कोळी, रमाकांत वाघचौडे यांनी सहकार्य केले. गायक कलावंतांना कुमार सुपेकर, मोहित निजाई, जयवंत फडके, वैभव जोशी, अशोक पवार या वादक कलावंतांनी साथ दिली. खुल्या गटात अक्षर वैरागी (प्रथम), आरती सत्पाल (द्वितीय), प्रज्ञा गावंड (तृतीय), अनन सावंत (चतुर्थ) यांच्यासह संतोष नाठे, खुशाली वैती, समीर लाड, रंजना कवडी, संतोष ननावडे (उत्तेजनार्थ) यांनी बाजी मारली. बालगटात आर्यन जामसुतकर (प्रथम), ब्राम्ही शेणॉय (द्वितीय), अक्षता वैरागी (तृतीय) आणि सूर्या राजन (चतुर्थ) यांनी बाजी मारली. (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय अभंग स्पर्धेत वैरागी प्रथम
By admin | Published: July 21, 2016 3:38 AM