मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नामसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता ठगांनी लसीकरण नोंदणीच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून फसवणूक सुरू केली आहे. त्यामुळे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले.महाराष्ट्र सायबर विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणात, लसींच्या तुटवड्यामुळे लस मिळणार की नाही, अशी चिंता अनेकांना आहे. नागरिकांच्या याच भीतीचा फायदा घेऊन ठग शासनाच्या नामसाधर्म्य दिसणाऱ्या बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक करत आहेत. लसीसाठी नोंदणी करण्याचा संदेश पाठवून त्याखाली लिंक पाठविण्यात येत आहे किंवा कॉल करून लवकर लस मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन यादव यांनी केले. संदेशाखालील अनोळखी लिंक उघडू नका. ती डाऊनलोड केल्यास मालवेअर, व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक हाेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
रेमडेसिविरच्या नावाखालीही गंडा- कोरोनावर उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देताे, असे सांगत संदेश पाठवून ठगण्याचा धंदा सुरू आहे. - यात, रेमडेसिविर उपलब्ध असल्याबाबत सोशल मीडियावर जाहिरात करण्यात येते. - जाहिरात बघून सावज जाळ्यात अडकताच त्यांना रेमडेसिविरसाठी ५० टक्के रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडून ठग नॉट रिचेबल होतात. - अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी खातरजमा केल्याशिवाय कुठेही पैसे पाठवू नका, असे आवाहन त्यांनी केले.