मुंबई : कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे गेले दोन दिवस बंद असलेले लसीकरण मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. शनिवारी महापालिकेने केवळ १९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली होती. मात्र यापुढे दररोज चार हजार जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आठवड्यातून चार दिवस ही लसीकरण माेहीम राबवली जाईल.कोरोनावर मात करण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला. मात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना संदेश गेलेच नाहीत. त्यामुळे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांसाठी ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.अखेर यात सुधारणा झाल्याने मंगळवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. महापालिकेच्या नऊ केंद्रांवरील ४० बूथवर दिवसाला चार हजार लाभार्थ्यांना लस दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५०० लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना मोबाइलवर संदेश जाणार असले तरी पालिकेकडूनही लाभार्थ्यांना संदेश पाठवले जाणार आहेत. लसीकरण सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत केले जाणार होते. मात्र, आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच लसीकरण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले.संदेश पोहोचलेच नाहीतलसीकरणाच्या दिवशी ज्या लाभार्थ्यांना लस द्यायची होती, त्यांना एक दिवस आधी एसएमएस पाठवले जाणार होते. मात्र, कोविन ॲपवरून संदेश पोहोचलेच नाहीत. आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पालिकेने फोन व एसएमएस करून लाभार्थ्यांना लसीकरणाला उपस्थित राहण्यास सांगितले. लस घेतल्यानंतर ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने ऑफलाइन नोंदणी करण्याची मागणी राज्याच्या टास्क फोर्समार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने त्याला नकार दिल्याने कोविन ॲपमध्ये सुधारणा होईपर्यंत लसीकरणाला स्थगिती देण्यात आली.
आजपासून रोज चार हजार जणांचे लसीकरण; पालिका प्रशासन सज्जच, आठवड्यातून चार दिवस राबवणार माेहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 4:22 AM