वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यात मुबलक पाऊस पडत असून डोंगराळ भागात पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात. त्यामुळे आधीच हिरवळीने नटलेल्या येथील भागाचे सौंदर्य द्विगुणित होऊन जाते. खोडाळा मार्गावर असलेल्या वडपाडा येथील धबधब्यावर तर पर्यटकांची एकच गर्दी असते.पावसाळा आला की, सर्वांच्या अंगात लहर येते ती भटकंती करण्याची मग त्यासाठी धबधबे, हिल स्टेशन, धरणे अशा ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात. वाडा तालुक्यातील खोडाळा रोड हा देखील पर्यटकांच्या पसंतीला उतरलेलं एक ठिकाण आहे. वाडा शहर सोडून निघालो की खोडाळा रोडला १० किमी पासून डोंगरदऱ्या सुरू होतात. पावसाळ्यात थंडगार हवा, धुके व हिरवळीसोबत दुधासारखे दिसणारे धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. पाण्यात भिजलेला २० किमी अंतराचा रस्ता कापून गेलो की वडपाडा येथे रस्त्यावरच एक लांब असा धबधबा आपल्याला थांबायला भाग पाडतो. येथे दररोज अनेक पर्यटक येत असल्याने गर्दी कायम असते. खाण्यापिण्याची सामग्री सोबत आणणे उत्तम कारण हे ठिकाण डोंगरात असल्याने नाश्ता अथवा जेवणाची येथे काही व्यवस्था नाही. मनसोक्त अंघोळ करून आपण पुढे आमला घाटातील धुक्यात दडलेला स्वर्ग डोळ्यात साठवू शकता. तसेच चिंचोट्या रस्त्याने सुर्यमाळ या हिल स्टेशनवर भेट देऊन पुढे त्र्यंबक मार्गे नाशिकला अथवा शिर्डीला जाऊ शकता.>अस्वच्छता अन् दारुड्यांचा धिंगाणावडपाडा येथील धबधबा तसा अतिशय सुंदर स्वच्छ असला तरी असुविधांमुळे धोकादायक आहे. येथे नुकताच एक तरुणाचा सेल्फी काढतांना पडून मृत्यू झाला. प्रशासनाने या धबधब्याच्या विकासाकडे मात्र स्पष्ट दुर्लक्ष केलेले दिसते. निसरडे मार्ग, अस्वच्छता व दारुड्यांचा धिंगाणा येथील सौंदर्याला गालबोट लावतो. मात्र काही किरकोळ गोष्टी सोडता वडपाडा व खोडाळा रोड हा वन डे पिकनिकसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
वडपाडा धबधब्यावर पर्यटकांचा पूर
By admin | Published: July 11, 2017 3:58 AM