मोबीन खान
औरंगाबाद ( वैजापूर ) - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा पुन्हा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मात्र उमेदवारी निश्चितचे हमीवर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला बसणारे राजकीय धक्के थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यभरातून एकामागून एक नेता राष्ट्रवादीला रामराम करत सत्ताधारी पक्षात जात आहे. आता नव्याने एक नाव समोर येत आहे. राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. आधी शिवसेना व आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये रंगत आहे. वैजापूरची जागा शिवसेनेकडे असून, त्यामुळे ही जागा भाजपासाठी सोडून त्या ठिकाणची उमेदवारी पदरात पाडून घेण्याच्या अटीवर ते प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.
शिवस्वराज्य यात्रा औरंगाबादमध्ये आली असता, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. तेव्हापासून चिकटगावकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ऐनवेळी ते कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.