लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैशाख वणव्यामुळे मुंबईसह राज्यभरातील शहरांचे कमाल तापमान चढेच असून, बहुतांशी शहरांनी चाळिशी गाठली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तापला असून, मुंबईचा तर घाम निघत आहे. त्यात आता पुढील पाच दिवसांसाठी राज्यात हवामान कोरडे राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा अहवाल हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
७ ते ११ मे यादरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येईल. ८ ते ११ मे यादरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येईल. दक्षिण हरियाणा व पूर्व राजस्थानमध्ये ९ ते ११ मेदरम्यान उष्णतेची लाट येईल. ८ ते ९ मेदरम्यान पश्चिम मध्य प्रदेश आणि १० ते ११ मेदरम्यान दक्षिण पंजाब व जम्मू येथे उष्णतेची लाट येईल.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग
७ ते ११ मेकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
७ ते ११ मेविदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाटअमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.