शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : जम्मू येथे वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या येथील १२ युवकांची सैन्यदलाच्या मदतीमुळे पुरातून सुटका झाली. तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देऊन वैष्णव देवी भक्त गावी परतल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.२८ आॅगस्टला हे तरुण दर्शनासाठी रवाना झाले. दर्शन घेऊन ते श्रीनगरला गेले. परंतु झेलम नदीला आलेल्या पुरामुळे सर्व जण श्रीनगरमध्ये एका हॉटेलात अडकले. भारतीय जवानांनी बोटीने त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. पूरस्थिती नियंत्रणात येईपर्यंत त्यांचा श्रीनगरमध्येच मुक्काम होता. ३० आॅगस्टला जम्मूत पोहोचलेल्या तरुणांनी कटरा येथे जाऊन १ सप्टेंबरला श्रीनगरमधील सोनबर्ग आणि गुलबर्गला भेट दिली. तेव्हा तेथे पाऊस सुरू होता. श्रीनगरमधील झेलम नदीच्या काठावरील एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी थांबले. मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजेदरम्यान हॉटेल परिसरातील घरे पाण्यात बुडाली. जीव मुठीत धरून हॉटेलमधील सर्व जण वरच्या मजल्यावर गेले होते. (वार्ताहर)
विदर्भातील वैष्णव देवी भक्त काश्मीरमधून परतले
By admin | Published: September 15, 2014 4:12 AM