शेलपिंपळगाव : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या १८६व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास उद्या (मंगळवारी) आषाढ वद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होत आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णवजन माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवतील. आनंददायी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन तो स्वत:च्या नयनांनी अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली असून, प्रस्थान सोहळ्याच्या तयारीत मग्न आहेत.तत्पर्वी, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. वारकऱ्यांच्या सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत. पासव्यतिरिक्त भाविकांना महाद्वारातून प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने मंदिराच्या पूर्वेकडील द्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेश दिला जात असलेल्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या निनादात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करीत दिंडी, पालखीसमवेत आळंदीनगरीत दाखल झाल्याने पूर्वसंध्येला पवित्र इंद्रायणीकाठ वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे. अलंकापुरी वारकऱ्यांनी अगदी दुमदुमून सोडली आहे. >चोख बंदोबस्त : आषाढी पायीवारीसाठी राज्याच्या काना-कोपऱ्यातून असंख्य भाविक-भक्त आळंदीत दाखल झाल्याने संपूर्ण शहरासह पवित्र इंद्रायणीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे. माउलींचा १८६ वा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा आज मंगळवार (दि.२८) रोजी सायंकाळी चारला संपन्न होणार आहे. प्रस्थानपूर्वीची जय्यत तयारी देवस्थान, पोलीस प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून, आता प्रत्येकाला वेध लागले आहेत ते फक्त माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे.>दुपारी २.३० ते ३ वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश. दरम्यान श्रींना पोशाख.सायं. ४ वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. श्री गुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती. त्यानंतर संस्थानाची आरती, नारळ प्रसाद व विधिवत मानपानाचा कार्यक्रम.माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व मंदिरात प्रवेश करतील. पालखीमध्ये श्रींच्या चल पादुका प्राणप्रतिष्ठापित केल्या जातील.त्यानंतर पालखी महाद्वारातून प्रस्थान ठेवून प्रदक्षिणा मागार्ने हा सोहळा आजोळघरी पहिल्या मुक्कामी स्थिरावेल.
इंद्रायणीकाठी जमला वैष्णवांचा मेळा!
By admin | Published: June 28, 2016 12:46 AM