कोल्हापूर : थायलंड येथे होणाऱ्या खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या वैष्णवी किरण पाटील हिची ईपीच्या फेन्सिंग क्रीडा प्रकारामध्ये भारतीय संघात निवड झाली. ही स्पर्धा बँकॉक - थायलंड येथे दि. २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती कॉलेज आॅफ फायर इंजिनिअरिंग अॅन्ड सेफ्टी मॅनेजमेंटचे प्राचार्य किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, वैष्णवी ही पश्चिम महाराष्ट्रामधील भारतीय संघामध्ये एकमेव महिला खेळाडू आहे. ही स्पर्धा व्यक्तिगत व सांघिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये वैष्णवी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ती पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. शालेय राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले कांस्यपदक व वर्षभरातील वेगवेगळ््या स्पर्धांमध्ये तिची कामगिरी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये २६ देश सहभागी होणार असून ५५० खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतातून २२ खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैष्णवी या स्पर्धेसाठी सध्या दोन ते तीन तास सराव करत असून तिला क्रीडा प्रशिक्षक संजय चिले, श्रद्धा टोपकर, जिल्हा फेन्सिंगचे विनय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विनय जाधव, वैष्णवी पाटील, युवराज पाटील, तेजस चव्हाण, क्रांतिसिंह देसाई उपस्थित होते.
वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड
By admin | Published: September 23, 2015 11:42 PM