तळेगाव दाभाडे : येथे २२ डिसेंबर २०१६ रोजी झालेला वैष्णवी लोहट या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अखेर मित्रविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मानवाधिकार संघटनेचा पाठपुरावा व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानंतर पालकांच्या मागणीची दखल घेतली.तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारअर्जावरून खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आल्याचे सांगितले. आरोपींबाबत माहिती देण्यास मात्र त्यांनी असमर्थता व्यक्त केली.वैष्णवीचे वडील हेमंत लोहट यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक यांनी लेखी निवेदन दिले होते. त्याची प्रत पुणे ग्रामीणचे अधीक्षक, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनाही पाठवली होती. त्यानंतरही पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. नगरसेवक किशोर भेगडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस प्रदीप नाईक, तसेच मयूर राजगुरव, रोहन राजगुरव, मयूरेश कुलकर्णी, विनीत वर्तक, अॅड. रोहित राजगुरव व अॅड. राम शहाणे यांच्यासह सुमारे २५ महिलांनी आज आक्रमक भूमिका घेतली.उपअधीक्षक मुजावर यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात येऊन निवेदन स्वीकारले व याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून स्वत: पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपास करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)>तपासाची मागितली माहितीलोहट यांनी वैष्णवी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी २१ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी सातला तळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासाचा पोलिसांनी खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली होती. शवविच्छेदन अहवालाचा तपशील, रेल्वे पोलिसांच्या अहवालाचा तपशील, वैष्णवीचे २०-२१ डिसेंबर या दोन दिवसातील फोनचे तपशील, तिच्या महाविद्यालयीन हजेरीचा तपशील या सर्वांचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
वैष्णवीचा घात, नव्हे घातपात
By admin | Published: January 19, 2017 2:06 AM