वैजापूर (जि. औरंगाबाद) : इसिस या दहशतवादी संघटनेचे वैजापूरशी कनेक्शन असल्याचा पर्दाफाश राष्ट्रीय तपास संस्था व दहशतवाद प्रतिबंधक विरोधी पथकाने शनिवारी केला. तपास पथकाने शहरातील बर्डी परिसरातून इम्रान मोअज्जम खान (२६) यास अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून धार्मिक पुस्तकांसह दोन लॅपटॉप व तीन मोबाईल हस्तगत केले. तपास अधिकाऱ्यांनी संध्याकाळी विमानाने इम्रानला दिल्लीला नेले.शहरातील येवला रोडवरील एनएमसी विश्रामगृहात ५ तास अत्यंत गोपनीय चौकशी करून नंतर इम्रानला वैजापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्थेचे पोलीस उपअधीक्षक निरज रॉय व औरंगाबाद येथील दहशतवाद प्रतिबंधक विरोधी पथकाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंग गौर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने शनिवारी सकाळीच बर्डी परिसरातील इम्रानच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तो सापडला नाही. कुटुंबीयांनी त्याला लपवून ठेवले होते; झाडाझडतीमध्ये तो घरातच सापडला. पोलिसांची तीन तासांपेक्षा जास्त वेळ झडती सुरू होती. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेऊन पाच तास अज्ञातस्थळी त्याची चौकशी केली. दुपारी तीन वाजता त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. एंडाईत यांच्या न्यायालयासमोर ट्रांझिट रिमांडसाठी उभे करण्यात आले. इम्रानचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातील हल्क-ए-दवानायक शाळेत झाले. त्याने औरंगाबाद येथील सर सय्यद महाविद्यालयात पुढचे शिक्षण घेतले. त्याने कॉम्युटर इंजिनिअरिंगची पदविका घेतली आहे. इम्रान, तसा बेरोजगारच होता. तो लॅपटॉप दुरुस्तीचे किरकोळ काम करीत होता. त्याचे वडील मोअज्जम खान यांचे निधन झाले आहे. इम्रानसह घरात तीन भावंडे आहेत. इम्रान सर्वात लहान आहे. (प्रतिनिधी)इम्रान तसा नाहीच!इम्रानचा मोठा भाऊ शहरातील उर्दू शाळेत शिक्षक आहे. दुसरा भाऊ पाटबंधारे विभागात नोकरीला आहे. एटीएस पथकाने केलेल्या कारवाईसंदर्भात लोकमत प्रतिनिधीने त्यांना विचारले असता, ते म्हणाले की, इम्रानचे अशा संघटनांशी कधीही व कोणतेही संबंध असूच शकत नाहीत. तपासाअंती सत्य समोर येईलच. भारतीय राज्य घटनेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.दिल्लीला नेले इम्रानला सायंकाळी ५.१५ वाजता औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला नेण्यात आले, अशी माहिती विमानतळावरील विश्वसनीय सूत्रांनी दिली.आॅक्टोबरपासून वैजापुरात इम्रान मुंबईतील अंधेरी येथे एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो मुंब्रा येथे राहत होता. आॅक्टोबर २०१५ मध्ये त्याने नोकरी सोडली आणि तो वैजापूरमध्ये कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्तीचे काम करत होता. मुंब्रा कनेक्शन राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे मोठी कारवाई करीत इसिसशी संबंधित मुदब्बीर शेख ऊर्फ आमीर या म्होरक्यास बेड्या ठोकल्या. इम्रान हा मुदब्बीर शेखकडे दोन वर्षांपासून काम करीत होता, अशी माहितीही समोर आली आहे.दोन वर्षांपूर्वी लॅपटॉपची चोरी दोन वर्षांपूर्वी मुंबईला जाताना मनमाड रेल्वे स्थानकावर इम्रानचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्यात त्याचा संपूर्ण डाटा होता. त्याने पोलिसांत तक्रार केली होती. नंतर चोर पकडला गेला; मात्र त्याच्याकडे लॅपटॉप मिळाला नव्हता.
वैजापुरचा तरुण एटीएसच्या जाळ्यात
By admin | Published: January 24, 2016 12:27 AM