मुंबई: अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या निर्णयांमुळे कटुता निर्माण होणार नाही याची सदैव काळजी घ्यायचे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तसं नाही. ते अतिशय कठोरपणे पावलं टाकून निर्णयांची अंमलबजावणी करतात, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी-माजी पंतप्रधानांच्या कार्यशैलीची तुलना केली. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी नेहमीच त्यांच्या कृतीतून आणि कामातून आदर कमावला, असं कौतुकोद्गारदेखील पवार यांनी काढले. 'वाजपेयी अतिशय सुसंस्कृत होते. तर मोदी अतिशय प्रभावी आहेत. एखादी योजनेची अंमलबजावणी करताना त्यांच्यातील प्रभावीपणा दिसतो. एखादा निर्णय घेतल्यावर मोदी अतिशय कठोरपणे तो अंमलात आणतात,' असं म्हणत शरद पवारांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीतील फरक स्पष्ट केला. 'कोणाच्याही मनात कटू निर्माण होणार याची काळजी नेहमी वाजपेयी साहेब घ्यायचे. त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता आणि आजही आहे. पण मोदींच्या कामाची पद्धत वाजपेयींपेक्षा वेगळी आहे,' असं पवारांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.आजी-माजी पंतप्रधानांबद्दल बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'मुख्यमंत्री शेतकरी आणि उद्योग जगताचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. फडणवीसांचं नेतृत्त्व फारसं प्रभावी आणि परिणामकारक नाही,' अशा शब्दांमध्ये पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. संकटात सापडलेल्या शेतीला भाजपा सरकार जबाबदार असून शेतकरी अस्वस्थ असल्याचं पवार म्हणाले. राज्यातील उद्योगदेखील अडचणीत सापडले आहेत. अनेक कारखाने बंद पडले आहेत, असं म्हणत पवारांनी भाजपा सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
आई शप्पथ... मोदींच्या धडाडीचं शरद पवारांकडून कौतुक; तेही निवडणुकीच्या तोंडावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 6:32 PM