ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - शिना बोरा हत्याकांडातील तपास अधिकारी असणारे खार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कनोरे यांच्या पत्नीची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या त्यांच्याच मुलगा सिद्धार्थ यानेच केल्याचा संशय वाकोला पोलिसांना आहे. तो अजूनही बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सांताक्रूझ पश्चिमेकड़ील प्रभात कॉलनीतील ए जे पार्क मध्ये गनोरे पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धार्थ सोबत राहतात. सिद्धार्थ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मंगळवारी गनोरे यांनी सकाळची शिफ्ट असल्याने लवकर घर सोडले. जाताना त्यांची मुलासोबत भेट झाली. त्याच्याशी संवाद साधुन ते कामावर निघून गेले. रात्री घरी येण्यास त्यांना उशीर झाला. पहाटेच्या सुमारास ते घरी परतले तेव्हा दरवाजा बाहेरुन बंद होता.
त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर कॉल केले मात्र आतूनही काही प्रतिसाद नसल्याने दरवाजा तोडून ते आत गेले असता पत्नी रक्ताच्या थारोळयात आढळून आली. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास दिली. घटनेची वर्दी मिळताच वाकोला पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दीपाली यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. तसेच त्याचा बंद मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहीती समजते. त्यामुळे प्राथमिक तपासात मुलावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.