ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - महापालिका निवडणुकांनंतर शिवसेनेसोबत जाण्याची गरज पडणार नाही. कुणी कितीही टीका करो, महापालिकेत महापौर आमचाच बसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही व्हॅलेंटाइन डे 21 फेब्रुवारीला मुंबईकरांसोबत साजरा करणार आहोत. माझा कट्टावर देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकांनंतरही शिवसेना पाठिंबा काढणार नाही, पाच वर्षे युतीचं सरकार सत्तेत राहील आणि मीच मुख्यमंत्री राहीन. पारदर्शकतेच्या मुद्द्यामुळे शिवसेनेलाच युती मान्य नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. तसेच शिवसेनेच्या नोटिशीला मी अजून नोटीस केलेलं नाही, असं म्हणत शिवसेनेला जुमानत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेने घोटाळे केले असतील तर ते मांडावेच लागतील. महापालिकेत भाजपाही शिवसेनेसोबत असली तरी अनेक प्रस्तावांना भाजपाने वेळोवेळी विरोध केला होता. पण शिवसेनेने इतर पक्षांच्या पाठिंब्याने ते प्रस्ताव मान्य करून घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. केंद्राचा मुंबई महापालिका पारदर्शी असल्याचा अहवालाबाबत उद्धव ठाकरेंच्या सल्लागारानं चुकीची माहिती दिली आणि तो अहवाल उद्धव ठाकरेंनीही नीट वाचला नसल्यानेच ते पारदर्शीपणाबद्दल बोलत आहेत, असा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
21 फेब्रुवारीला मुंबईकरांसोबत साजरा करू व्हॅलेंटाइन डे- मुख्यमंत्री
By admin | Published: February 16, 2017 3:31 PM