राजू काळे/ऑनलाइन लोकमत भार्इंदर, दि. 13 - गेल्या काही वर्षांपासुन वॅलेंटाईन डे या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवसाचा ज्वर वाढू लागला आहे. या दिवसाचा अर्थ तरुण मंडळींकडुन वेगळा काढला जात असला तरी या दिवसाला आपली नाती प्रेमभावनेतुन दृढ करण्याचा दिवस मानणाऱ्यांचा वर्गही अस्तित्वात आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी भार्इंदर येथील एका वृद्ध दांपत्याने गेल्या वर्षभरापासुन त्रस्त असलेल्या पायातील नसांच्या दुखण्यापासुन मुक्त होण्यासाठी वॅलेंटाईन डेच्या १० दिवस अगोदर एकत्रपणे शस्त्रक्रिया करुन घेत हा दिवस साजरा करण्याचा निर्धार केला आहे. प्रेमभंग झाला कि प्रेमी युगुल जीवाचं बरं-वाईट करुन घ्यायला तत्पर होतात. त्यातुनच प्रयत्न झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु, भार्इंदर येथील शैलेश मेहता (५६) व काश्मिरा मेहता (५३) हे वृद्ध दांपत्य त्याला अपवाद ठरले आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करता यावा, यासाठी त्यांनी आपल्या वेदनेवर एकत्रपणे शस्त्रक्रिया करुन घेतल्याने त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले जात आहे. मेहता दांपत्याला वर्षभरापासुन व्हेरीकोज व्हेन नामक पायांतील नसांच्या आजाराने ग्रासले होते. यात त्यांच्या पायाची हालचाल मंदावल्याने त्यांना घराबाहेर पडण्यासाठी मदतनीसाची आवश्यकता भासे. त्यामुळे मुलांवर अवलंबुन असलेल्या दांपत्याला यंदाच्या वॅलेंटाईन डे मुकण्याची चिंता वाटू लागली. हे दांपत्य आपल्या मुलाबाळांसह कुटुंबातील व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी वॅलेंटाईन डे साजरा करतात. त्यात ते मुलांबरोबर भेटवस्तूची शॉपिंग, सिनेमा व हॉटलमध्ये जेवनाचा बेत आखायचे. परंतु, यंदा पायाच्या दुखण्यामुळे हा दिवस साजरा करण्यापासुन आपण वंचित राहणार कि काय, अशी चिंता त्यांना सतावु लागली. याची कुणकूण त्यांच्या मुलांना लागल्याने त्यांनी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात आई-वडीलांना उपचारासाठी नेले. तेथील या आजाराचे तज्ञ डॉ. हिमांशू शहा यांनी मेहता दांपत्याला आधुनिक लेजर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्याला मान्यता दिल्यानंतर डॉ. शहा यांनी शैलेश यांच्या पायावरील शस्त्रक्रियेनंतर काश्मिरा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. परंतु, शैलेश यांनी वॅलेंटाईन डे काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तो आम्हाला साजरा करायचा आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या पायांवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करण्याची विनंती त्यांनी डॉ. शहा यांना केली. मेहता दांपत्याचे एक दुजे के लिए प्रेम पाहता डॉ. शहा यांनी शैलेश यांची विनंती मान्य केली. शैलेश यांच्या दोन्ही तर काश्मिरा यांच्या एका पायावर ४ फेब्रुवारीला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याने ते यंदाचा वॅलेंटाईन डे आनंदाने साजरा करु शकतील, असे रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. चौकट : या आजाराबाबत माहिती देताना डॉ शहा म्हणाले, या आजारामुळे पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून गाठीं तयार होतात. त्यामुळे पायांची हालचाल पूर्णपणे मंदावुन रुग्णांना वेदना होतात. हा आजार जीवघेणा नसला तरी त्याची लागण १०० पैकी ९ जणांना होते. सतत उभे राहण्याचे काम, स्थूलता, अनुवांशिकतेसह महिलांना प्रसूतीनंतर आजाराची लागण होते. भारतात बदललेल्या जीवनशैली व आयुर्मानामुळे वृद्धत्व लवकर येते. त्यातुनच वार्धक्याला सुरुवात होते. सध्या यावर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असल्याने तो आजार बरा होतो. त्यासाठी वेळेत उपचार सुरु करणे आवश्यक आहे.
व्हॅलेंटाइन डेसाठी आजी-आजोबांनी केली एकत्र शस्त्रक्रिया
By admin | Published: February 13, 2017 5:05 PM