ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - घाटी हा शब्द महाराष्ट्रात अनेकांना अपमानास्पद वाटतो असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणीत सांगितले. बद्री अय्यर या २५ वर्षाच्या चार्टड अकाऊंटसीच्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
कुलाबा पोलिस स्थानकाच्या उपनिरिक्षकांनी बद्री विरोधात सरकारी कर्मचा-याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि जाणीवपूर्वक अपमान करणे या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बद्रीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मात्र उच्च न्यायालयाने बद्रीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. बद्रीने दाखल केलेल्या याचिकेनुसार ३१ डिसेंबरच्या रात्री बद्री आणि त्याची मैत्रिण पार्टीसाठी कुलाबा क्लबमध्ये गेले होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास ते दोघे टॅक्सीची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एक पोलिस तिथे आला आणि त्याने दोघांना तिथून निघण्यास सांगितले.
त्यावेळी बद्रीने त्या पोलिसाला आपल्या मैत्रिणीला बरे वाटत नसून, आपण टॅक्सीसाठी थांबलो आहोत असे सांगितले. त्यावेळी दोन पोलिस तिथे आले आणि त्यांनी चौकशी सुरु केली. या पोलिसांनी मुलीच्या कपडयांवरुन शेरेबाजीही केली. त्यावरुन पोलिसांबरोबर वादावादी सुरु असताना पोलिसांनी मारहाण केल्याचे बद्रीने याचिकेमध्ये म्हटले आहे.
पण एफआयआरमध्ये पोलिसांनी बद्रीने मारहाण केली व अपमान करण्याच्या हेतूने घाटी म्हटले असे लिहीले आहे. सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी बद्रीला घाटी शब्द का वापरला असे विचारले. तुला घाटी शब्द वापरायची गरज नव्हती असे न्यायाधीशांनी सांगितले.
त्यावर बद्रीच्या वकिलांनी बद्री घाटी हा शब्द पोलिसांना नाही स्वत:ला उद्देशून बोलला असा दावा केला. त्यावर न्यायाधीशांनी महाराष्ट्रात घाटी हा शब्द अनेकांना अपशब्द, अपमानास्पद वाटतो असे सांगितले.
बद्रीला आयएएसच्या परिक्षेला बसायचे आहे. या परिक्षेला बसण्यासाठी तुमच्या नावावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद चालत नाही. त्यामुळे बद्रीचा एफआयआर रद्द करा अशी विनंती बद्रीच्या वकिलांनी न्यायालयाला केली. पण न्यायालयाने बद्रीची याचिका फेटाळून लावली.