बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहात बबन गित्ते आणि आठवले गँगकडून मारहाण करण्यात आली. या वादाला कारागृह प्रशासनानेही दुजोरा दिला असला, तरी वाद कोणाचा झाला हे सांगताना अधिकारी अडखळले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासह सात आरोपी आहेत. यातील कराड, घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत. तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते गँगमधील महादेव गित्ते आणि बीडमधील मकोका लागलेल्या आठवले गँगमधील आरोपी हेदेखील बीडच्या कारागृहातच आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता सर्वांना बाहेर काढल्यानंतर मारहाणीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
फोन लावण्यासाठी सर्कलमध्ये बाहेर काढल्यावर दोन गटांत वाद झाला. सुदीप सोनवणे आणि वाघमोडे यांच्यात वाद झाला. आरडाओरडा, गोंधळ झाला. कराडला मारहाण झाल्याचे कोणी पाहिले नाही. - बक्सर मुलाणी, कारागृह अधीक्षक, बीड