ऑनलाइन लोकमत -
पिंपरी सांडस, दि. 11 - संत तुकाराम महाराजांच्या यावर्षीच्या पालखी रथासाठी वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील प्रगतीशील शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब पठारे यांच्या मालकीच्या ‘सोन्या-हिरा’ या बैलजोडीची निवड करण्यात आली असल्याची माहिती वाडेबोल्हाई पंचक्रोशी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प.मल्हारी महाराज गावडे यांनी माहिती दिली.
पंढरीच्या पालखी रथासाठी या बैलजोडीच्या निवडीसाठी पठारे परिवाराकडून गेले तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या वर्षी संत तुकाराम महाराज या देवस्थान संस्थानाने ही निवड जाहीर केली. या निवडीचे पठारे परिवाराने गावात पेढे वाटून; तर ग्रामस्थांनी फटाके फोडून जंगी स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाची सेवा करण्याचा मान मिळावा, असे प्रत्येक शेतक-याची मनोमन इच्छा असते. या वर्षी आम्हाला ही संधी मिळाली, ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे पठारे यांनी सांगितले.
येत्या २८ जूनपासून पालखी परत येईपर्यंत या पालखी सोहळ्याची सेवा करण्याची संधी देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाने दिल्याबद्दल पठारे परिवाराने संस्थानाचे आभार व्यक्त केले, अशी माहिती वाडेबोल्हाई गावचे माजी सरपंच राजेंद्र पठारे यांनी दिली. मी आणि माझे कुटुंब सातत्याने पंढरीची वारी करीत असून, संत तुकाराम महाराजांच्या या वर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची झालेली निवड हे त्याचेच फळ आहे, अशी भावना अण्णासाहेब पठारे यांनी व्यक्त केली. बैलजोडीची निवड झाल्यानंतर ‘सोन्या-हिराला’ औक्षण बोल्हाई देवीच्या मंदिरात करुन गावात आणण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच विद्याधर गावडे, नितीन गावडे, अमोल गावडे, विशाल पायगुडे, नितीन इंगळे, प्रशांत पायगुडे, प्रशांत भोसले, विकास पायगुडे, राहुल इंगळे, अतुल चव्हाण, अजित चव्हाण, प्रतीक लोखंडे, सचिन भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.