- राम शिनगारे, औरंगाबाद
मराठवाड्यात सातत्याने असलेली दुष्काळी स्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम ध्यानी घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘श्वास’ ही योजना सुरू केली. या योजनेत कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी परिक्षेत्राबाहेरील विविध कार्यक्रमांत मिळणारे मानधन, प्रवास भत्ता जमा करण्याचा निर्णय घेतला. यातून प्रोत्साहन घेत विद्यापीठातील शेकडो प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी यास हातभार लावत लाखोंचा निधी जमा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षे मदतीचा हात दिला आहे.मराठवाड्यात २०१५-१६ या वर्षात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका सर्वसामान्य अनेक विद्यार्थ्यांना बसला. या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याएवढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. पण यातून मार्ग काढण्यासाठी ‘विद्यार्थी कल्याण व पुरस्कार योजना’ (श्वास) सुरू केली. ज्या विद्यार्थ्यांना सरकार व विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही, अशांना या योजनेंतर्गत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमध्ये कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर आपणाला बोलावण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे मानधन आणि प्रवास भत्ता जमा करण्यास सुरुवात केली.सन २०१५-१६ यावर्षी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी कुलगुरूंच्या प्रवास भत्ता व मानधनातून जमा झाला. तर विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या योजनेला हातभार लावून मुक्तहस्ते निधी दिला. यामुळे ‘श्वास’ योजनेत १३ लाख रुपये जमा झाले. यातून ५३९ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी दिली. हीच योजना २०१६-१७ शैक्षणिक वर्षात सुरू ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी पुण्यासह इतर ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तीची मदत घेतली आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून सुरुवात केल्यानंतर इतरांना ती सांगता येते. कोणत्याही संस्थेच्या प्रमुखांनी असे आदर्श घालून दिल्यास चांगला पायंडा पडण्यास मदत होते. यात मी पुढाकार घेतला. त्याला माझ्या विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिया पाठिंबा दिला. बाहेरूनही काही संस्थांनी मोलाची मदत केली. यातून काही गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करता आली, याचे समाधान आहे.- डॉ. पंडित विद्यासागर, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.