मुंबई : अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीसाठी आक्रमक झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात हजारोंचा धडक मोर्चा काढला. त्यानंतर जागे झालेल्या महिला व बाल विकास विभागाने या प्रश्नी कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात ठेवली आहे. विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आझाद मैदानात येऊन आंदोलकांना हे आश्वासन देत मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.दरम्यान, एका आठवड्याची मुदत मागणाºया सरकारला कृती समितीने एका महिन्याची मुदत दिल्याचे समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले. उटाणे म्हणाले की, कर्मचाºयांच्या मानधनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चाची हाक दिली होती. या वेळी पंकजा मुंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे. या बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित असतील, असेही त्यांनी सांगितले. मानधनवाढीला आपला पाठिंबा असून, यासंदर्भातील प्रस्ताव ७ जून २०१७ रोजी वित्तमंत्र्यांकडे पाठवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आठवड्याभराची मुदत मागून मुंडे यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. कृती समितीने घेतलेल्या बैठकीत तत्काळ आंदोलनाला स्थगिती दिली. शिवाय एक आठवड्याऐवजी मंत्र्यांना एका महिन्याची मुदत देण्याची घोषणा केली. मात्र ११ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत संपाचा इशाराही कृती समितीने दिल्याचे उटाणे यांनी सांगितले.पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यताअंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी शासनाने गठीत केलेल्या समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे वाढ करावी, अशी कृती समितीची प्रमुख मागणी आहे. सेवाज्येष्ठताप्रमाणे मानधनवाढ झाली नाही, तर कर्मचाºयांतील अंसतोष वाढेल असे कृती समितीचे म्हणणे आहे.आयसीडीएस योजना कायम करून तिचा दर्जा सुधारा, अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्या, टीएचआर (टेक होम रेशन) बंद करून सर्व लाभार्थ्यांना ताजा आहार द्या, अंगणवाडीत दोन वेळच्या आहारासाठी सध्या प्रतिविद्यार्थी फक्त ४ रुपये ९२ पैसे इतका निधी खर्च केला जात असून त्यात तिपटीने वाढ करा, आदी मागण्यांवर पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता कृती समितीने व्यक्त केली आहे.
मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 5:55 AM