मुंबई - वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम लोकसभा निवडणुकीत एकत्र लढले होते. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या दोन्ही पक्षात युती होणार असल्याचे बोलले जात असतानाच, सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे कारण देत एमआयएमने वंचित बहुजन आघडीसोबत जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे. मात्र असे असले तरीही एमआयएमने एकामागे एक उमेदवार जाहीर करण्याचा जो धडाका लावला आहे, त्यावरून ही युती होण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील युती पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र एकीकडे खासदार जलील म्हणत आहे की, आंबेडकर हे एमआयएम प्रमुख ओवेसी यांचा फोन उचलत नाही. तर दुसरीकडे निर्णय एमआयएमला घ्यायचा असून आमची दारे अजूनही उघडे असल्याचा दावा आंबेडकर करत आहेत.
दोन्ही पक्षातील नेते युती तुटल्याचा खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एमआयएमने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे सुरु केले आहे. इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत ७ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आता ओवेसी यांनी ५ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांची वाट न पाहता एकट्या लढण्याची तयारी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील युतीचा निर्णय वंचित राहणार असल्याची चर्चा आहे.