मुंबई - लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील फिसकटलेली युती विधानसभा निवडणुकीत व्हावी यासाठी हालचाली सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली आहेत. मात्र काँग्रेसला हे मान्य नसल्याने ही युती होणे अशक्य समजली जात आहे. मात्र असे असले तरीही वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर होईपर्यंत काँग्रेससाठी दारे उघडे असल्याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे संसदीय बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी केला आहे.
नुकतेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्द पत्रक काढत, प्रकाश आंबेडकरांनी जागा वाटपात सन्मान राखला नसल्याचे कारण देत युती तुटली असल्याचे जाहीर केले आहेत. मात्र असे असलेही तरी वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय अंतिम होऊ शकला नसल्याने दोन्ही पक्षातील नेत्यांना महाआघाडी होण्याची अपेक्षा लागली आहे. मात्र जागावाटपच्या आकड्यावरून ही युती फिसकटली जाणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.
मात्र असे असले तरीही वंचित आघाडीकडून काँग्रेसला शेवटची डेडलाईन देण्यात आली आहे. वंचित आघाडीचे संसदीय बोर्डचे सदस्य आणि प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांच्यातील युतीबाबत मोठा खुलासा केला आहे. वंचित आघाडीची पहिली यादी जो पर्यंत जाहीर होत नाही, तो पर्यंत काँग्रेससाठी १४४ जागांचा प्रस्ताव कायम असणार असून त्यांच्यासाठी आमची दारे अजूनही उघडे असल्याचे ते म्हणाले आहेत. मात्र ज्या दिवशी आमची पहिली यादी जाहीर झाली, त्यांनतर मात्र काँग्रेसचा आमच्या सोबत येण्याचा विषय बंद होईल.
त्यामुळे आता काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे १४४ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नसल्याचे काँग्रेसकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा संपूर्ण २८८ मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी मुलाखती सुरु केल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी या दोन्ही पक्षात युतीबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.