- मोसीन शेख
मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकरणात रोज नवनवीन घटना घडत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पडळकर हे दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांची अंतिम यादी पडळकर यांनी तयार केली होती. आणि आता तेच भाजपच्या मार्गावर आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून महासचिव गोपीचंद पडळकर यांचा पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपण आजपासून वंचितचे काम थांबवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी पडळकर यांनी केली होती. ही माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती.
पडळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न पत्रकारांनी रविवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारले होते. यावर उत्तर देतांना आंबडेकर म्हणाले होते की, पडळकर हे पक्षाच्या कार्यलयात बसून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करत आहे. मात्र आता 'वंचित'च्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करणारे गोपीचंद पडळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर नवल वाटू नयेत.
वंचित बहुजन आघाडीत काही आरएसएसशी सलग्न असलेली लोकं वंचित आणि एमआयएम यांच्यात युती होऊ नयेत म्हणून प्रयत्न तर करत नाही ना, याचा शोध प्रकाश आंबेडकर यांनी घ्यावा असा सल्ला काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. तर त्यांचा इशारा पडळकरांकडे असल्याची चर्चा होती. त्यातच आता पडळकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चीत समजले जात आहे.