मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर साताऱ्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून उदयनराजेंची कोंडी केली जातेय असा आरोपही मराठा क्रांती मोर्चाने काही दिवसांपूर्वी केला होता. उदयनराजेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे.
रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला प्रचंड प्रमाणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे येणारी पोटनिवडणूक उदयनराजेंसाठी कठीण जाणार असल्याचंही चित्र आहे. मात्र उदयनराजे शरद पवारांबाबत बोलताना भावूक होत जर शरद पवार स्वत: या निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपातील अंतर्गत राजकारण यात उदयनराजेंची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले जिजाऊंचे वारसदार नामदेवराव जाधव यांनी उदयनराजेंना वंचितमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.
याबाबत बोलताना नामदेव जाधव म्हणाले की, उदयनराजेंची होणारी घुसमट आम्हाला पाहवत नाही तुम्ही त्यांच्या बाजूने या ज्यांना तुमची गरज आहे-वतनदार तुमचा मान सन्मान ठेवत नव्हते आणि यापुढेही ठेवणार नाहीत म्हणून तुम्ही उपेक्षित वंचित घटकांच्या बाजून यावं जिथं तुमच्यासाठी जिव ओवाळून टाकणारी हजारो लाखो जिवाभावाची माणसं आहेत असं त्यांनी सांगितलं.
तसेच राजेपणाचा आव न आणता उदयनराजे सहजरित्या सामान्य माणसांसोबत वावरताना दिसतात. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात न जाता स्वत:चा पक्ष स्थापन केला असता तरी त्यांच्या मागे उभा महाराष्ट्र उभा राहील. पण त्यांना स्वत:चा पक्ष स्थापन करायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीत त्यांनी प्रवेश करावा, 87 टक्के उपेक्षित समाज तुमच्या मागे ठामपणे उभा राहील. तुम्ही वंचितमध्ये आलात तर साताऱ्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास नामदेवराव जाधव यांनी दिला.