मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असं सांगत एमआयएमचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मात्र एमआयने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 98 जागा मागितल्या असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने खोटा ठरवला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्द पत्रकात याचा खुलासा करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या चर्चेला एमआयचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी प्रसिध्द पत्रक काढून पूर्ण विराम दिला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केलं आहे.
त्यापूर्वी एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे 98 जागा मागितल्या असल्याचा दावा केला असल्याचे बोलले जात होते. मात्र जलील यांनी काढलेल्या पत्रकानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा प्रसिध्द पत्रक काढले आहे. ज्यात म्हंटले आहे की, एमआयएम अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांनी आम्हाला 17 जागेंची यादी पाठवली होती. त्यावर त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे एमआयएमने 98 जागा मागितल्या असल्याच्या वृत्ताचे यातून खंडन करण्यात आला आहे.
त्याच बरोबर युती तुटल्याचे संदेश किंवा कोणतेही पत्र आमच्याकडे आले नसल्याने, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील युती कायम असल्याचे आम्ही मानतो, असेही वंचित बहुजन आघाडीच्या वर्किंग कमिटीतर्फे रतन बनसोडे यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे.