VBA Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणूक रंगतदार स्थितीत येऊ लागल्याचे चित्र आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेस आग्रही असताना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट माघार न घेण्यावर ठाम राहिला. यामुळे इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. परंतु, आघाडी धर्म पाळण्याचे निर्देश काँग्रेसने नेते, पदाधिकाऱ्यांना दिले. यातच आता विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.
सांगलीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीकडून भाजपा उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. जनता कुणाच्या बाजूने कौल देते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीत सांगली जागेवरून धुसपूस सुरू असली तरी भाजपासह महायुती जोरदार प्रचार करताना दिसत आहे. सांगलीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने आता ही निवडणूक आणखी चुरशीची आणि रंगतदार होण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढला आणि विशाल पाटील यांना दिला
सांगलीत वंचित बहुजन आघाडीने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर आणि प्रतिक पाटील यांची भेट झाली, त्यावेळेस त्यांनी पाठिंबा देण्याविषयी विधान केले होते. प्रतिक पाटील माझ्याकडे आले होते. काय करायचे विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यानुसार आता वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, सांगली लोकसभेत विशाल पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षामध्येच मोठी नाराजी पसरली. आमदार विश्वजित कदम यांनी या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींसमोरच मनातील खंत बोलून दाखवली होती. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने अन्य पक्षातील उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज, नागपुरातून विकास ठाकरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, यवतमाळ वाशिममधून अनिल राठोड, अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यात आला आहे.