पुणे - लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आलेली वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचं समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यावर लक्ष्मण माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी केली.
या आरोपावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे. आरएसएसशी माझे संबंध होते. भिडे गुरुजींशी माझे संबंध होते या सगळ्याची उत्तर मी याआधीच दिली आहे. पक्षात येताना हा सगळा खुलासा करुन आलो आहे. महासचिवपदावर माझी निवड होणार याची कल्पनाही मला नव्हती. बैठकीत लक्ष्मण माने यांनीच नाव सुचवलं. मी त्यांना सांगितलं नव्हतं की माझे नाव पुढे करा. त्यामुळे लक्ष्मण माने यांना काही आक्षेप असतील तर ते अध्यक्षांकडे मांडावेत असं त्यांनी सांगितले.
तसेच लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या चार बैठका झाल्या. या बैठकीत लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतले नाही मग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने आताच आक्षेप का घेत आहेत? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच प्रदेशाध्यक्षपद मिळत नसल्याने लक्ष्मण माने नाराज आहेत. लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादीशी संबंध आहे, ते त्यांची भाषा ते बोलत आहेत. माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे असा आरोप पडळकरांनी केला.
लक्ष्मण माने यांनी आरएसएस आणि भाजपाच्या लोकांनी वंचित आघाडी व्यापून टाकली आहे त्यामुळे ही आघाडी बहुजनांची नसून उच्चवर्णीयांची झाली आहे असा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे. गोपीचंद पडळकर यांचे नाव पक्षाच्या बैठकीत मी सुचविले होते. मात्र अध्यक्षांच्या सांगण्यावरुन आपण गोपीचंद पडळकरांचे नाव पुढे केले असं लक्ष्मण माने यांनी सांगितले. पडळकरांनाच अधिकार मिळणार असतील तर आमचं पक्षात काय काम असा सवाल लक्ष्मण माने यांनी केला होता.