बीड - काँग्रेसवालेराहुल गांधीचे गुणगान गातात. फार चांगली गोष्ट आहे. राहुल गांधींना निर्णय घेण्याचे शिकवा. एकाबाजूला राहुल गांधी अदानींविरोधात आंदोलन करतोय. अदानींची अर्थव्यवस्था ही देशाला धोक्यात आणतोय म्हणून सांगतोय. चूक नाही बरोबर सांगतायेत. ते चुकीचे सांगत नाही. परंतु ज्याच्यासोबत राहुल गांधींनी मैत्री केली असा NCP म्हणतंय, अदानीशिवाय दुसरा चांगला माणूस नाही. त्याच्या उद्धाटनाला मी जाणार आहे. तो राहुल गांधींच्या छाताडावर नाचायला सुरुवात करतो ही आजची परिस्थिती अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. बीड येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एकतर तुम्ही अदानींच्या बाजूने आहात किंवा विरोधात आहे. जे विरोधात आहे ते एकाबाजूने, तुम्हाला एक बाजू घेतली पाहिजे. पण हा राहुल गांधी निर्णय घेऊ शकत नाही. कुठल्या बाजूला जायचे आणि कुठे नाही. राहुल गांधी अदानींना विरोध करतात. शरद पवार पाठिंबा देतात आणि हे दोघे म्हणतात आमची राजकीय युती आहे. तलवारीमध्ये एकच म्यान लागते. एका म्यानात २ तलवारी राहत नाही. ज्याला निर्णय करता येत नाही. तो या देशाचे नेतृत्व कसं करणार? हा साधा प्रश्न आहे, फार मोठा निर्णय नाही. साध्या प्रश्नावर राहुल गांधींना निर्णय करता येत नसेल तर त्याच्या काँग्रेसनं आमच्या नादी लागू नये असा टोला त्यांनी लगावला.
त्याचसोबत ज्यांना राजकीय निर्णय करता येत नाही ते नरेंद्र मोदींविरोधात काय लढणार आहे? ते अमित शाहांच्या अंगावर तुम्ही कसे जाणार आहे. ज्याच्या स्वत:च्या खेळाचे मैदान करता येत नाही तो म्हणतो मी क्रिकेट खेळायला चाललोय. कुणाला मित्र करायचे आणि कुणाला नाही हे अजून ठरतच नाही. येत्या कालावधीत एक गोष्ट नक्की, इंडिया टिकते की नाही याचा निकाल त्याठिकाणी लागतो. काँग्रेस लालू-नितीश बरोबर राहील. पण काँग्रेस ममता बॅनर्जींसोबत राहील का हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या राज्यात युती झालीय ती काँग्रेस टिकवेल की नाही हा खरा प्रश्न आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेसचे जे बगलबच्चे आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेत त्यांना माझा सवाल आहे की, तुमची नेमकी भूमिका सांगा. आम्हाला म्हणतायेत, एका पत्राने युती होते का? मग कशाने होते? एकमेकांना सांगूनच युती होते ना...आम्ही चिठ्ठी लिहिली, आम्ही तुमच्यावर प्रेम करायला मागतोय, तुम्ही आमच्यावर प्रेम करा. काँग्रेसला प्रेम करण्यासाठी मोदींनी परवानगी लागते. त्यांनी परवानगी दिली तर ते आपल्यावर प्रेम करतील. जर प्रेम केले नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे. आपल्याला आपला मार्ग करायचा असेल तर, उद्याची लढाई आपल्याला जिंकायची असेल, संविधान टिकवायचे असेल तर ही निर्णायक लढाई आहे. हा येड्यागबाळ्याचा खेळ नाही. टिंगळटवाळीचा वेळ नाही. उद्याचा काळात माझा मानसन्मान १ किलो मटण, निवडणुकीतील दारूसाठी इमान गहाण ठेवायचा का हे आपल्याला ठरवायचे आहे असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेसला इशारा दिला.
मोदींना हिमालयात पाठवून द्या
लोकसभेची निवडणूक जसजसं जवळ येईल तसतशी या देशातील परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्यासारखी होईल. आता RSS चा नवीन प्रचार सुरू झालाय. मोदींना तिसरी टर्म मिळणार, २ वर्ष पंतप्रधान राहणार त्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार चाललाय. तुम्ही २ वर्ष कशाला सांगताय? तुम्ही आत्ताच त्यांना हिमालयात पाठवून द्या. या देशाचे भले होईल असं आरएसएसवाल्यांना प्रकाश आंबेडकरांनी आव्हान दिले.
काँग्रेस नेते मोदींच्या सांगण्यावर वागतात
ईडीच्या चौकशीला कोण कोण गेले? मध्यंतरी सोशल मीडियात अशी एक पोस्ट फिरत होती. त्यात काँग्रेसमधल्या जेवढ्यांवर चौकशी होती त्यांचे नाव आणि फोटो होते. ज्यांची नावे होती त्यांना मोदींनी म्हटलं, माझ्याविरोधात जाताय जा, एप्रिल महिन्यापर्यंत मी या देशाचा पंतप्रधान कायम आहे. त्याच्यामुळे मी सांगतो तसं वागायचे नसेल तर तिहार जेलचा मार्ग मोकळा आहे. कुठला मार्ग ठरवायचा ते तुम्ही सांगा, मोदी सांगतील तो मार्ग ते स्वीकारतील. तुम्ही वेगळे लढा असं मोदींनी त्यांना सांगितले आहे असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे.