पुणे - Sujat Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. अशावेळी युती आणि आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात. महाविकास आघाडीची आज जागावाटपावर बैठक होणार आहे. तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. यावेळी पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असं सुजात आंबेडकरांनी म्हटलं आहे.
पुण्यातील मेळाव्यात सुजात आंबेडकर म्हणाले की, एक महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे युती तर दुसरीकडे आघाडीची बोलणी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेणार की नाही अशी चर्चा आहे. ही वंचित बहुजन आघाडी सातत्याने लोकशाही टीकवण्यासाठी, संविधान वाचवायला, मोदी-शाह, आरएसएसला छातीवर लढलोय, केवळ लढलो नाही तर त्यांना पुरुन उरलोय अशा वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी घेत नाही. जर यावेळी महाविकास आघाडीने खोडसाळपणा केला तर जनता माफ करणार नाही हे याद राखा असं त्यांनी म्हटलं.
तसेच जर तुम्ही युती करताना मागून काही कटकारस्थान रचलं. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर तो खंजीर तुम्ही फक्त एका पक्षाच्या नव्हे, एका नेत्याच्या नव्हे तर बाबासाहेबांना मानणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या मोठ्या समुदायाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करताय, हे लक्षात ठेवावे. महायुतीतही सगळं काही सुरळीत चाललंय असं नाही असंही सुजात आंबेडकरांनी सांगितले.
दरम्यान, अजितदादांची लोक लढलेले शिंदेंच्याविरोधात, शिंदे गटाचे लोक लढलेले अजितदादांविरोधात, कोणती जागा कुणाला सुटेल यावरून वाद आहेत. त्यातून गोळीबार होतायेत. कधी फेसबुक लाईव्हमध्ये तर कधी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात गोळीबार होतोय. या परिस्थितीत माझ्या तरूण, विद्यार्थी, युवक आणि नवमतदारांना आवाहन आहे की, युती आणि आघाडीच्या भानगडीत सगळे सत्तेच्या मागे लागलेले असताना वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम ठेवते. आम्ही सत्तेत आलो तर विकासासाठी काय करू हे आम्ही तुमच्यासमोर ठेवतो असं सुजात आंबेडकरांनी जनतेला सांगितले.