लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व सत्ताधारी भाजपने कोरोना संसर्ग व पावसात गोरगरिबांची घरे पाडून माणुसकीला काळीमा फासला आहे. ही कारवाई निर्दयी असून झोपडी वासियांचे पुनर्वसन करा तसेच या बांधकामांना जबाबदार नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली आहे. त्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
काशीमीराच्या माशाचा पाडा मार्गावरील महापालिका मालकीच्या उद्यान व रस्ता आरक्षण मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन पक्की व कच्ची बेकायदेशीर बांधकामे झाली होती. शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात येथील सुमारे ३०० कच्ची - पक्की अनाधिकृत बांधकामे पालिकेने तोडून टाकली होती. पालिकेच्या कारवाई नंतर बेघर झालेले झोपडीवासी त्याच ठिकाणी आपले बिर्हाड मांडून बसले. शनिवारी उर्वरित बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिका पथक जाणार होते. पण राजकीय हस्तक्षेप व पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण सूत्रांनी सांगत कारवाई केली गेली नाही.
दरम्यान सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे मीरा भाईंदर अध्यक्ष सलीम खान यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पालिका प्रवेशद्वारा बाहेर धरणे धरत कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महापालिका व स्थानिक भाजपा नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
महापालिकेची जागा होती तर त्यामध्ये बांधकामे झाली कशी ? या बांधकामांना कर आकारणी, पाणी, वीज आदी सुविधा पालिकेने दिल्या होत्या. इतके होई पर्यंत नगरसेवक व अधिकारी झोपा काढत होते का ? याच्या मुळे गोरगरीब बेघर झाले व त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी तसेच कर आकारणी, पाणी व वीज देणारे आदींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वंचितचे शहर अध्यक्ष सलीम खान, प्रवक्ते महेंद्र चाफे, महिला अध्यक्षा मीना सोरटे, रंजना भगत, अनिल भगत आदींनी केली आहे.
बेघर केलेल्याचे पालिकेने पुनर्वसन करावे . जय बजरंग नगर चे शौचालय पालिकेने काढले त्यावर उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृहनेते प्रशांत दळवी व स्थानिक भाजपा नगरसेवकांनी मानवताचा हवाला दिला होता. मग आता तर शेकडो लोकांचे संसार उध्वस्त करून सत्ताधारी भाजपाने मानवतावाद दाखवला आहे का ? अशी टीकेची झोड वंचितच्या आंदोलकांनी उठवली आहे.