अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 09:02 AM2024-06-23T09:02:17+5:302024-06-23T09:03:44+5:30
अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई - राज्याच्या राजकारणात कधी काहीही घडू शकतं हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याचदा पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला. त्यानंतर महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले. अजित पवारांना मित्रपक्षांनी टार्गेट केले, त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. अशातच राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रातील चित्र बदलेल अशी वैयक्तिक भूमिका मांडली. त्यावर आता वंचित बहुजन आघाडीकडूनही भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे महायुती फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबत विधान अमोल मिटकरींनी केले. अजित पवार आणि त्यांचा पक्ष भाजपासोबत आहे. या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी युतीबाबत विचार करू शकणार नाही. जोपर्यंत अजित पवार गटानं भाजपासोबत संबंध तोडला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपाशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे त्यामुळे या विधानाचा आता काही विचार करता येणार नाही असं सांगत रेखा ठाकूर यांनी तूर्तास तरी युतीच्या चर्चेवर पूर्णविराम दिला आहे.
अजित पवार यांचा गट भाजपच्या युतीमधून बाहेर पडल्याशिवाय सोबत येण्याचा कुठलाही विचार केला जाऊ शकत नाही.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 22, 2024
― रेखाताई ठाकूर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी#VBAForIndiapic.twitter.com/s29w7pmsP8
तर अमोल मिटकरींनी विचारपूर्वक बोलावं, पलटी मारण्याची वेळ येणार नाही असेच बोलावे. सातत्याने आपल्या राजकीय पटलावरती स्वत:च्या विधानापासून पळ काढणे, आपण असं म्हटलेच नाही असं बोलण्याची वेळ येणार नाही अशी काळजी घ्यावी. तुम्ही जाहीरपणे जी इच्छा व्यक्त केली होती तो महाराष्ट्राने पाहिला, पण काही तासांत दुसरा व्हिडिओ समोर आला त्यात तुम्ही ते विधान नाकारतायेत त्यामुळे यापुढे काळजी घ्या असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले.
अमोल मिटकरी यांनी विचारपूर्वक बोलावं आणि ज्यावर ठाम राहता येईल असं बोलावं. आपल्याच विधानापासून पलटी मारण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 22, 2024
― @siddharthmokle
प्रदेश प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी pic.twitter.com/gKLHVoWXu5
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
जर महायुतीत ५०-५५ जागांवर राष्ट्रवादीची बोळवण होणार असेल तर स्वतंत्र लढण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. पण अजित पवार एकटेच आहेत आणि एकटेच लढतील असं मित्रपक्षांनी समजू नये. राजकारणात काहीही होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी प्रकाश आंबेडकरांना नेहमीच आदर्श मानत आलोय. राजकारणात अजित पवार आदर्श आहेत. भलेही मी वंचित बहुजन आघाडीचा नाही. पण बाबासाहेबांचे वारसदार असलेले प्रकाश आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा ही जोडी महाराष्ट्रात पुढे आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल. आंबेडकरी चळवळ जर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि राजकारण फार वेगळे असेल. जर अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावून एकत्र लढले तर मग महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला होता.