मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस उत्सुक आहे. तर वंचित कडून ४० जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस यासाठी तयार नाही. एकीकडे काँग्रेस आणि वंचित यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा सुरु असतानाच तिकडे वंचित बहुजन आघाडीनेविधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची स्वबळाची तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत आहेत.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अनपेक्षित मते मिळाल्याने काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळे हीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होवू नये. यासाठी काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र असे असताना तिकडे, वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे चे संकेत दिले आहेत. १३, १४ व १५ जुलै रोजी विदर्भातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
वंचितकडून १३ जुलै रोजी नागपूर, १४ जुलै रोजी अमरावती येथे त्यानंतर १५ जुलै रोजी अकोला वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून काय प्रतिसाद मिळणार याची वाट न पाहता वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागा लढण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत आहे.