Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये मेगाभरती सुरुच! पडळकर, पावरांनी हाती घेतलं कमळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:30 PM2019-09-30T13:30:51+5:302019-09-30T13:49:06+5:30
विधानसभा निवडणुकीआधी पडळकरांची घरवापसी
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपला रामराम केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांना बारामतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
गोपीचंद पडळकर, काशीराम पावरा यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचं तोंडभरुन कौतुक केलं. गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असं फडणवीस म्हणाले. पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्त्वाशी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
शिरपूरचे आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये दाखल झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पावरा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिश पटेल यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे पटेलदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतदेखील दिले आहे. अमरिश पटेल 2 दिवसात भाजपमध्ये येणार असल्याचं पाटील म्हणाले. आमदार आले की त्यांच्या नेत्यांना यावंचं लागतं, असं विधान या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे अमरिश पटेल लवकरच कमळ हाती धरण्याची शक्यता आहे.